तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत मेहनतीने सेंद्रिय पोषण परसबाग फुलली आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा येथे सेंद्रिय पध्दतीने पोषण परसबाग उमेद महिला गटाच्या मदतीने विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी जून 2024 महिन्यात परसबाग तयार करून त्यात वेलवर्गीय भाज्या भोपळा,दोडका,गिलके,वालोरा,चवळी तसेच वांगी,टोमॅटो ,मिरची फळभाज्या पालक,चुका,शेपू,कोथिंबीर पालेभाज्या लागवड करण्यात आली.त्यासाठी उमेद महिला गटाच्या मार्गदर्शनात भाज्यांच्या वाढीसाठी गाईचे शेण,गोमूत्र, गूळ, बेसन पीठ, ताक ,वारुळाची माती यापासून विद्यार्थीनींनी जीवामृत तयार करून भाज्यांना घातले.गोमूत्र व झाडपाला यापासून कीटक नाशक तयार करून भाज्यांवर फवारणी केली.विद्यार्थीनी व शिक्षकवृंद बागेतील गवत काढणे,पाणी घालणे ,तयार भाजीची काढणी,खुरपणी ही कामे अतिशय आनंदात व जबाबदारीने करतात.परसबागेतील पोषक सेंद्रिय भाज्या वापरुन स्वादिष्ट, रुचकर ,पौष्टिक मध्यान्ह भोजन विद्यार्थ्यांना मिळते.स्वनिर्मितीचा आनंद मिळतो.सेंद्रिय शेतीचे महत्त्व व गरज विद्यार्थीनीना समजावून सांगितली जाते.प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण दिले जाते.मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शिक्षिका, विद्यार्थीनी या सर्वांच्या सहभागातून व मेहनतीने शाळेची सेंद्रिय पोषण परसबाग फुलली आहे.