भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील युवक दूध उत्पादक शेतकरी आणि स्वराज्य संघटनेच्या वतीने आज दूध विकास मंत्री यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत स्वतःच्या रक्ताने निवेदन सादर करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी दुधाला हमीभावासह इतर मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे.
गाईच्या दुधाला 70 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 70 रुपये हमीभाव देण्यात यावा. पशुखाद्यासाठी 40 ते 50 टक्के अनुदान शासनाने उपलब्ध करून द्यावे. बंद पडलेले प्रति लिटर दूध अनुदान त्वरित सुरू करावे. गाईंच्या खरेदीसाठी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य द्यावे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा: दुधाच्या स्थिर किंमतींच्या अभावामुळे दूध उत्पादन परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. औषधे, पशुखाद्य, आणि गाईंच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर झाला आहे. परिणामी, अनेक शेतकरी नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत.
शासनाने लवकरात लवकर या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वराज्य संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य ॲड. विलास पवार यांनी दिला आहे. शासनाकडे तरुण शेतकऱ्यांची अपेक्षा पारंपरिक शेती व्यवसायाला पूरक म्हणून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसायाकडे वळत आहे. त्यामुळे शासनाने वेळेत मदतीचा हात दिला. तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.
यावेळी स्वराज्य संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश नलवडे, युवा तालुका अध्यक्ष अभी कराळे, ह.भ.प. गणेश महाराज अंधारे, तसेच शेतकरी सुरेश कावळे, राहुल शेंडगे, महेश गिरी, तुषार हिवरे, शिवशंकर पवार, आणि ज्येष्ठ शेतकरी भागवत साळुंखे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.