धाराशिव (प्रतिनिधी)- दिव्यांग व्यक्तींचे जीवन थोड्या प्रमाणात का होईना सुसह्य व्हावे यासाठी त्यांना कृत्रिम अवयव दिले जातात.त्यांना आता आधुनिक पद्धतीने तयार केलेले कृत्रिम हात व पाय वितरण करण्यात येत आहेत.त्यामुळे या सुविधेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बंधू भगिनींनी लाभ घेऊन आपले जीवन सुकर करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी केले.
आज 21 जानेवारी रोजी धाराशिव पंचायत समिती सभागृहात दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात पाय बसविणे व केली पर्स स्लिप्त यांचे मोजमाप तात्काळ ऑन द स्पॉट वितरण करणे या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे सच्चिदानंद बांगर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एस फुलारी,जनकल्याण समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व्यंकट लांमजणे, सोमनाथ चपने, एस.आर. ट्रस्ट गोवाचे संचालक डॉ. रुपेश जाधव, अलिम्को कंपनीच्या डॉ. रुक्मिणी सोनेवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ ओंबासे पुढे म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम पद्धतीचे हात किंवा पाय चांगले व दर्जेदार तसेच त्यांना त्याचा अगदी सहजासहजी वापर करता यावा. यासाठी आर्टिफिशियल लिम्ज या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींनी ग्रामपंचायत येथे संपर्क करून आपली सर्व माहिती द्यावी.सर्व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून त्याची माहिती एकत्र करून तालुकास्तरावर पंचायत समिती येथे कृत्रिम हात व पाय याचे मोजमाप व वितरण ऑन द स्पॉट करण्यात येणार आहे.त्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. विशेष म्हणजे कृत्रिम हात व पाय वेगवेगळ्या प्रकारामध्ये उपलब्ध असल्यामुळे ते दिव्यांग व्यक्तींना हाताळणे सोयीस्कर होणार आहे. त्यांना पूर्वीसारखेच अवयव भेटल्याचा अनुभव घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महादेव कांबळे (जवळा खुर्द), अमित शेख (बेंबळी),विष्णू पवार (भाटशिरपुरा), तुकाराम घुटे (काजळा),उद्धव शेरखाने (रुईभर), रामू घोडके,मनोरमा कुलकर्णी, येसाजी कोळी, हरिश्चंद्र शिंदे, महादेव ठोकळे, शमशद शेख, भास्कर आडसुळ, विकास पाटील, अविनाश पवार, समाधान लोखंडे, संजय शिंदे, दत्ता मंजुळे, सुर्यकांत काटे व श्रीदेवी गायकवाड यांना कृत्रिम हात व पायांचे वितरण करण्यात आले.
दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात व पाय या अवयवाचे वितरण जिल्हाभरात पंचायत समिती येथे करण्यात येणार आहे. तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्याचे नाव व संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे - धाराशिव व कळंब - सचिन जाधवर ( 8459402892), उमरगा - श्रीराम शिंदे ( 9421351551),लोहारा - शंकर जाधव ( 8275454738), तुळजापूर - अण्णा कोल्हटकर ( 9890587512),भूम, परंडा व वाशी - सचिन जाधवर ( 8459402892) तरी दिव्यांग बांधवांनी आपल्याला लागणाऱ्या कृत्रीम अवयवांसाठी वरील व्यक्तींच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.