परंडा (प्रतिनिधी) - अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन आरोपींवर परंडा पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी फरार आहे. ही घटना तालुक्यातील आवार पिंपरी ते करंजा मार्गावर मंगळवार दि.21 जानेवारी रोजी दुपारी घडली आहे.
याबाबत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, येथील तहसीलदार यांच्या आदेशानुसार मंडळाधिकारी दुर्गाप्पा पवार, तलाठी अनिरुद्ध काळे व महालिंग स्वामी हे तिघे करंजा शिवारातील शेत रस्ता खुला करून देण्यासाठी दुचाकीवरून जात होते. अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर निदर्शनास आला. सदरील ट्रॅक्टर थांबवला असता मंडळाधिकारी दुर्गाप्पा पवार यांनी ट्रॅक्टरची चावी काडून घेतली असता चालकांनी त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. फोन वरून नागनाथ नरसाळे यास बोलावून घेतले. त्यांनी दमदाटी करून ट्रक्टर चालु केला असता मंडळाधिकारी पवार हे ट्रॅक्टरवर चढले असता चालकांने 2 ते 3 किलोमीटर भरधाव वेगाने चालविला. खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टरवरिल बसलेले मंडळाधिकारी पवार चालु ट्रॅक्टर वरून खाली पडले. यात पवार जखमी झाले असता ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून गेला. महसुलच्या पथकाने नायब तहसिदार माढेकर यांना सदरील घटनेची माहिती दिली असता त्यांनी परंडा पोलिसांना घेऊन घटना स्थळी दाखल दाखल झाले. पोलिस हवालदार विशाल खोसे, पोलिस अंमलदार उंदरे यांनी ट्रक्टर ट्रॉलीसह परंडा पोलिस ठाण्यात आणला. या प्रकरणी मंडळाधिकारी पवार यांनी दिलेल्या फिर्यादी वरून नागनाथ डाकवाले व नागनाथ नरसाळे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एकास अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी फरार झाला आहे. सदरील प्रकरणाचा अधिक तयास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिरसाठ हे करीत आहे.