धाराशिव (प्रतिनिधी)-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाची यंत्रणांनी प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध योजनांची प्रगती,विकासकामांचे अंमलबजावणीचे टप्पे,तसेच प्रलंबित प्रकल्पांवरील कार्यवाहीसाठी सर्व विभागांनी नागरिकांना उत्तम सुविधा देण्याबरोबर कामांचा वेळेत निपटारा करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले.

आज 21 जानेवारी रोजी डॉ.ओंबासे यांनी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री 100 दिवस कृती कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय यंत्रणाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,प्रभारी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भंडे,जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे,तहसीलदार (महसूल) जगताप,नगर पालिका प्रशासनचे सहायक आयुक्त डोके यांची उपस्थिती होती.तर दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध विभागाचे जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात 100 दिवसांत सर्व कार्यालयांनी नागरिकांना जलद सुविधा देण्यासह कार्यलयातील जुन्या अभिलेखांचे निर्लेखीकरण करून अभिलेख कक्षाचे नुतनीकरण करावे. कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लोकसेवा हक्क कायदा, नागरिकांची सनद लावावी.कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था,लाईटची व्यवस्था,नागरिकांची गर्दी असते अशा कार्यालयांनी भिंतीच्या कोपऱ्यात स्टाइल लावून घेऊन नागरिक थुंकणार नाहीत याची काळजी घ्यावी.रेकॉर्ड रूम व्यवस्थित ठेवण्यासह ई-डिजिटल रेकॉर्ड रूम तयार करून चांगल्या सुधारणा कराव्यात.सेवा पुस्तके अद्यावत करावे.असे ते म्हणाले.

 
Top