धाराशिव (प्रतिनिधी) - लोकांना चांगला मार्ग समजतो की आपणाला कुठल्या मार्गाने जायचे आहे. त्यासाठी धम्म परिषदा होणे आवश्यक आहे. कारण धम्म परिषदांमुळे चांगले वातावरण निर्माण होते, धम्माबद्दल चर्चा होते व दिशा मिळते. पूर्वी धम्म परिषदा व रिपाइंच्या सभा एकत्र व्हायच्या. भारतीय बौद्ध सभा व रिपाइंचे नेते एकाच मंचकावर बसायचे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर रिपाइं नेत्यांनी महाराष्ट्रासह देशात राजनीतीला महत्त्व दिले. त्यामुळे धम्म चळवळ अधिक गती घेऊ शकली नाही. असे प्रतिपादन भारतीय महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले.

धाराशिव तालुक्यातील तगर (तेर) भूमी येथील बौद्ध धम्म परिषदेत ते बोलत होते. यावेळी भन्ते उपगुप्त महाथेरो, आयोजक भन्ते सुमेधजी नागसेन, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक बापूसाहेब गायकवाड, माजी तहसिलदार बापू सोनटक्के, कैलास शिंदे, विमलताई रणदिवे, अनिल हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना भीमराव आंबेडकर म्हणाले की, त्यावेळची व आताची परिस्थिती वेगळी असल्यामुळे धम्म चळवळ वाढण्यास मोठा वाव आहे. त्यासाठी सर्व छोट्या-छोट्या घटकांना सोबत घेणे आवश्यक आहे. जेव्हा धर्मसत्ता व राजसत्ता एकत्र येतात तेव्हा देशाचा व समाजाचा विनाश होतो असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. धाराशिव येथे येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये धम्म परिषद घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. धाराशिव जिल्ह्यात एकीकडे तेर येथील म्युझियम व कसबे तडवळा येथील ऐतिहासिक बैलगाडी तर दुसरीकडे सातवाहन काळातील कोरीव लेणी असल्यामुळे ही भूमी पवित्र असल्याचे त्यांनी सांगितले.  

याप्रसंगी भन्ते सुमेधजी नागसेन, बापू गायकवाड यांचे भाषण झाले. या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार उपाध्यक्ष विजय बनसोडे, केंद्रीय शिक्षिका विजयमाला धावारे, केंद्रीय शिक्षक गुणवंत सोनवणे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, कोषाध्यक्ष उमाजी गायकवाड, जिल्हा महिला सचिव विद्याताई कांबळे, मनोरमा काटे यांच्यासह धाराशिव, लातूर, सोलापूर, नांदेड, बीड आदी ठिकाणांहून बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top