धाराशिव (प्रतिनिधी)- गरीब व असुरक्षित कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या आरोग्य सेवांचा लाभ मिळावा,यासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध आजारावरील उपचार व शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाचे असणारे आयुष्यमान भारत कार्ड काढण्याच्या मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले.
दि. 20 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा आढावा घेताना डॉ.ओंबासे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.शिल्पा डोमकुंडवार,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.तानाजी लाकाळ, उपशिक्षणाधिकारी आर.सी.मैंदर्गी, डॉ.एस.एस.फुलारी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.ओंबासे पुढे म्हणाले,आयुष्यमान कार्ड काढण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी 27 जानेवारीपासून दोन आठवड्याचे जिल्हाभर शिबिराचे आयोजन करावे. ज्या आशा वर्कर यांनी आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांना मदत केली, अशा आशा वर्कर्स यांना कामाचे देयक अदा करावे. तर
डॉ.घोष यांनी आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आयोजित करण्यात येणारे शिबिरे यशस्वी करण्यात यावे. आयुष्यमान कार्ड काढण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
46 कोटी रूपयांचे उपचार व शस्त्रक्रिया
आत्तापर्यंत या योजनेतून जिल्ह्यातील 46 कोटी रुपयांचे उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून नागरिकांना प्रतिवर्षी पाच लाख रुपयापर्यंत मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येतात. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी केले आहे.