धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वर्षातील सर्वाधिक दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असल्यामुळे धाराशिव सोलार प्रकल्पासाठी राज्यात सर्वात अनुकूल जिल्हा आहे. त्यामुळे 300 मेगावॅटचा क्षमतेचे सोलर प्रकल्प उभारणीसाठी तब्बल 1350 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी देशभरातील नामवंत कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. यातून रोजगार निर्मितीलाही मोठी चालना मिळणार आहे. तुळजाभवानी मंदिर समितीच्या जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या सोलार प्रकल्पाबाबत मंदिर समितीच्या कार्यालयात देशातील नामवंत कंपन्यांनी सादरीकरण केले असल्याची माहिती समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ तथा महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ख्याती असलेल्या आई तुळजाभवानी देवीचे मंदिर आणि शेकडो वर्षांपासून तुळजाभवानी देवीच्या मंदिरात वेगवेगळ्या सेवा रुजू करणाऱ्या मठाच्या शाश्वत उत्पन्नात वाढ करण्याच्या अनुषंगाने मंदिर संस्थानच्या जागेवर सोलार प्रकल्प उभारण्याबाबत ठराव संमत करण्यात आला होता. सोलार प्रकल्प उभारण्यासाठी इच्छुक असलेल्या देशभरातील नामांकीत कंपन्यांकडून सादरीकरणासाठी प्रस्तावही मागविण्यात आले होते. मंदिर समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील इच्छुक असणाऱ्या दहा कंपन्यांनी उत्स्फूर्तपणे सोलार प्रकल्प उभारण्यासाठी तयारी दर्शवली आहे. शुक्रवारी या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तुळजाभवानी मंदिर संस्थान तसेच विविध मठांच्या जमिनीवर कशा पद्धतीने सोलार प्रकल्प साकारला जाणार याबाबतचे वस्तुनिष्ठ सादरीकरण केले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, मंदिर संस्थानच्या तहसीलदार माया माने, तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यासह विविध दहा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
500 हून अधिक रोजगारनिर्मिती
या प्रकल्पात तब्बल 1350 कोटींचा गुंतवणूक व त्यातून 500 हुन अधिक रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. सौर व पवन ऊर्जा प्रकल्पासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी आपण नियोजन केले आहे. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य विकासाचे अल्प कालावधीचे कोर्स चालू करण्यात येणार आहेत अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.