भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने परंडा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव कल्याणस्वामी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा असे केल्याबद्दल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यक्रम घेऊन कल्याण स्वामींची प्रतिमा व दासबोध ग्रंथाची प्रत भेट देण्यात आली.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेना स्थानिक महापुरुषांची नावे देऊन त्या महापुरुषांचा एकप्रकारे गौरवच केलेला आहे त्याच हेतूने त्यांनी समर्थ रामदास स्वामींचे शिष्य व ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या परंडा नगरीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस कल्याणस्वामी महाराज हे नाव देऊन महाराष्ट्र सरकारने एक प्रकारे गौरवच केला आहे.
त्या संदर्भात कल्याण स्वामी मठ डोमगाव येथील मठपती डॉ. संजयकुमार जहागीरदार, परंडा येथील मठपती पुरुषोत्तम वैद्य यांचे चिरंजीव नागेश वैद्य, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विकासराव कुलकर्णी, लक्ष्मण गोरे, सारंग खंडागळे, विशाल काशिद व शहाजी चौधरी यांनी औद्योगिक प्रशिक्षण येथे जाऊन एक छोटेखाणी कार्यक्रम घेतला व प्राचार्य कदम सरांना कल्याणस्वामींची प्रतिमा व दासबोध ग्रंथ भेट दिला.
तसेच डॉ संजय जहागीरदार यांनी कल्याण स्वामींचे चरित्र सांगितले, विकासराव कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील येथील सर्व स्टाफ व प्राशिक्षनार्थी उपस्थित होते. प्राचार्य कदम यांनी प्रास्ताविक केले. फाळके यांनी आभार प्रदर्शन केले.