धाराशिव (प्रतिनिधी)- पाकिस्तानातून तस्करी मार्गे गुजरातमध्ये सापडलेल्या 890 कोटी रूपयांच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचे परळी कनेक्शन समोर आले आहे. गृह विभागाने या बाबीचा सखोल तपास करायला हवा. गुजरातच्या ड्रग्जसोबत असलेले हे परळी कनेक्शन पाकिस्तानी आतंकवादी संघटनांशी तर जोडले गेले नाही ना? असा सवाल उपस्थित करीत धाराशिव येथील जनआक्रोश मोर्चात आमदार सुरेश धस यांनी गौप्यस्फोट केला.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्त्येच्या निषेधार्थ धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवार, 11 जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, बजरंग सोनवणे, संदीप क्षिरसागर, ज्योतीताई मेटे, दिपक केदार, नरेंद्र पाटील, खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार प्रविण स्वामी, सचिन खरात, वैभवी संतोष देशमुख आदी उपस्थित होते.

सत्तेच्या आडोशाला राहून अफाट संपत्ती कमविणारी ही मुजोर गुंडशाही आहे. या गुंडांचे अन्याय सहनही केले असते. मात्र ज्या पध्दतीने त्यांनी संंतोष देशमुख यांची हत्त्या घडवून आणली आहे. ते सर्व काही संतापजनक आहे. याप्रकरणातील अन्य आरोपींना मोक्का लावल्याचे समजले. मात्र यातील मास्टरमाईंड आणि खंडणीच्या आरोपात अटकेत असलेल्या गुन्हेगाराला मात्र मोक्का लावला नाही, याचे कारण समजले नाही. हा खून करणारे आणि तो घडवून आणण्यासाठी कट रचणाऱ्या सगळ्यांना फाशी व्हायला हवी. त्यांना पाठीशी घातल्यास भविष्यात दिवस उघडायच्या आत लोकांचे मुडदे पडतील, अशा शब्दांत आमदार धस यांनी धाराशिव येथील जनआक्रोश मोर्चानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्त्येतील आरोपींना फाशी होण्यासाठी तपास यंत्रणांनी सखोल तपास करावा व पीडित कुटुंबीयांना न्याय व मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. या जनआक्रोश मोर्चात जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांतील पदाधिकारी, समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चानंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे मोर्चेकऱ्यांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून मी व सर्व समाज बांधव देशमुख कुटुंब यांच्या पाठीशी आहोत. आरोपी सिद्ध झालेले आहेत. ज्याने मारले त्यांना पकडले आहे.  परंतु यामागे जे मास्टरमाईंड आहेत त्यांना पोलीस का पकडत नाहीत, असा सवाल उपस्थित करत ओबीसी समाजाचे पांघरून घेऊन बसलेल्यांना आपण आता धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. धनंजय मुंडे सुद्धा या प्रकरणात आरोपी आहे. त्याला पकडलेच पाहिजे. मुख्यमंत्री साहेब, धनंजय मुंडेला तात्काळ मंत्री पदापासून मुक्त करून त्याच्यावर कारवाई करा अन्यथा 23 जानेवारीपासून मराठा आरक्षण आणि देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करणार, असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 


आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे

वडिलांची हत्त्या झाल्याच्या दिवसापासून आम्हा कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस यांच्यासह सर्व समाजबांधव लढ्यात साथ देत आहेत. आम्हा कुटुंबीयांची एकच अपेक्षा आहे की, वडिलांची हत्त्या करणाऱ्या आणि ती घडवून आणणाऱ्या सर्व आरोपींचा शोध घेवून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे. एवढीच सरकारकडे अपेक्षा आहे, असे मत मयत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने व्यक्त केले.

 
Top