भूम (प्रतिनिधी)- शाकंभरी पौर्णिमानिमित्त येथे आयोजित चौंडेश्वरी देवी महोत्सवात सोमवार दि. 13 जानेवारी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी जानेवारी 5 ते 13 जानेवारी या 9 दिवसाच्या कालावधीत झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. हभप. रवींद्र हरणे महाराज मुक्ताईनगर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. सदरील शोभायात्रेत सर्व कोष्टी समाज बांधव सहभागी झाले होते.
यावेळी शोभायात्रेचा प्रारंभ चौंडेश्वरी देवीची पालखीसह सकाळी वरद विनायक मंदिरातून झाला. शोभायात्रेत कलशधारी महिला यांनी सहभाग घेतला. हिरवा मारुती मंदिर, शेंडगे गल्ली, गांधी चौक,चौंडेश्वरी मंदिर, नगरपरिषद चौक, लक्ष्मी रोड, गोलाई चौक, परंडा रोड मार्गे ही शोभायात्रा परत वरदविनायक मंदिर परिसरात विसावली. शोभायात्रेनंतर चौंडेश्वरी देवीची महाआरती झाली.
यानंतर चौंडेश्वरी तरुण व एकता मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर भरवण्यात आले होते. यामध्ये 73 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. ही शोभायात्रा भूम नगरपरिषद समोर नागोबा चौक येथे आले असता माजी नगराध्यक्षा संयोगिताताई संजय गाढवे व युवा नेते साहिल गाढवे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालखीचे स्वागत करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. सप्ताहदरम्यान महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार,भारूडकार यांचे कार्यक्रम पार पडले. चौंडेश्वरी तरुण व एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.