धाराशिव (प्रतिनिधी)-  शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 20 हजार स्वेअर फुट पोस्ट ऑफिसची जागा असतानाही अतिशय कमी जागेत जिल्ह्याचे मुख्य पोस्ट ऑफिस व कर्मचारी जीव मुठीत घेवून कार्यरत असल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या धाराशिव येथील मुख्य पोस्ट ऑफिस इमारत मोडकळीस आल्याचे दिसत आहे. या संदर्भात भारतीय मजदूर संघाने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी डाकघर अधिक्षक कार्यालयाकडे केली आहे. 

धाराशिव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुख्य पोस्ट ऑफिसची 19999 स्वेअर फुट जागा आहे. त्यापैकी सध्याचे मुख्य पोस्ट ऑफिस 4371 स्वेअर फुटमध्ये 1972 साली उभारलेले आहे. पॉर्किंग इमारतीसह 5464 स्वेअर फुट जागेत इमारत उभा आहे. या बाजुलाच निजामकालीन इमारत 3818 स्वेअर फुटामध्ये बंद अवस्थेत पडून आहे. मुख्य पोस्ट ऑफिस व निजामकालीन बंद अवस्थेत असलेली इमारत मोडकळीस आल्यामुळे कर्मचारी व पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना कधी धोका होईल हे सांगता येत नाही. गेल्या काही वर्षापासून शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले मुख्य पोस्ट ऑफिसची जागा विकसित करण्याची मागणी शहरवासियांकडून होत आहे. परंतु केंद्र सरकारकडून याबाबत प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गेल्या टर्ममध्ये दिली होती. 

धाराशिव येथील डाकघर अधिक्षक कार्यालय केवळ जागेअभावी लातूरला हलविण्यात आले आहे. यामुळे अनेक कामांची अडवणूक सध्या धाराशिव जिल्हावासियांची होत आहे. 20 हजार स्वेअर फुट जागा असतानाहीदेखील केवळ केंद्र सरकार व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे कमी जागेत मुख्य पोस्ट ऑफिसच्या कारभार सध्या चालू आहे. या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहक सेवेसह पासपोर्ट ऑफिस, पोस्टल बँक, पोस्ट ऑफिस, आधार केंद्र हे सर्व सुविधा पोस्ट ग्राहकांसाठी सुरू आहे. त्यासाठी 50 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे धाराशिव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस इमारत नव्याने उभारण्यात यावी. जेणेकरून ग्राहकांनाही उत्तमरित्या सेवा देता येईल व शहराच्या सौदर्यात भर पडेल. 


मुख्य पोस्ट ऑफिसची दुरावस्था

मुख्य पोस्ट ऑफिस इमारतीची दुरावस्था झाली असून, स्लॅबमधून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे अनेकदा नुकसानही झाले आहे. इमारतीचे प्लास्टर पडले असून, त्यामुळे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे शेजारी निजामकालीन इमारतीची पण दुरावस्था झाली आहे. या जुन्या इमारतीमुळे सध्याच्या मुख्य पोस्ट ऑफिस इमारतीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करावे व टपाल कर्मचारी व जनतेची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशी मागणी मुख्य पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी तथा भारतीय मजदूर संघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य 

 विजयकुमार वाघमारे यांनी डाकघर अधिक्षक कार्यालयाकडे पत्राद्वारे केली आहे. 

 
Top