धाराशिव (प्रतिनिधी)- जगभरात शिर्डी देवस्थान नामांकित म्हणून गौरविले जाते. अगदी तसाच लौकिक तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर नगरीला मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शिर्डीप्रमाणेच तुळजापूरमध्ये भाविकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यावर आपला भर आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर संस्थांनच्या धर्तीवर तुळजापुरात कोणत्या सकारात्मक बाबी अंमलात आणता येतील याबाबत पाहणी करून माहिती जाणून घेतल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन अधिक सुलभ व्हावे, भाविकांच्या वेळेची बचत व्हावी, त्यासाठी शिर्डी आणि तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर भक्तांच्या सुविधेसाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यानुसारच एकविसशे कोटी रुपयांचा अंतिम तीर्थक्षेत्र विकास आराखडा दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर केला आहे. देवी दर्शनासाठी भाविकांना किती वेळ लागणार हे भक्तांना आधीच कळेल. त्यासाठी शिर्डी येथे केल्या जात असलेल्या कार्यपद्धतीची पाहणी केली. मागील वीस वर्षांत शिर्डी देवस्थानात कशापद्धतीने वेगात बदल घडवून आणला याबाबत शिर्डीचे आमदार तथा राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबरोबर शिर्डी विकासाबाबत प्रदीर्घ चर्चा झाली.याअनुषंगाने  तत्कालीन नगराध्यक्ष अशोक शेळके-पाटील व विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी  गोरक्ष गाडीलकर यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात मागील काही वर्षांपासून भाविकांची मोठी वाढलेली गर्दी वाढत आहे. त्यामुळे अद्ययावत सोयी-सुविधांच्या पार्श्वभूमीवर विकास आराखडा राबविण्याची गरज ध्यानात घेऊनच आपण काम सुरू केले आहे. अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.

 
Top