धाराशिव (प्रतिनिधी)- येथील मुक्तांगण प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या बाल चमूने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त अभिवादन करताना अनेक त्यांच्या जीवनातील हुबेहूब देखावे सादर करण्याचा प्रयत्न केला आणि एक आगळावेगळा आदर्श समाजापुढे ठेवला. येथील मुक्तांगण प्रायमरी इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांवर संस्काराच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असून आपल्या संस्कृतीमधील प्रत्येक सण ,उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.
यावेळी मुक्तांगण प्रायमरी स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा कमलताई नलावडे म्हणाल्या की, बालवय हे संस्कारक्षम वय असून त्यांना शिकविण्यापेक्षा त्यांच्याकडून एखाद्या प्रसंगाचे हुबेहूब चित्र कथेच्या माध्यमातून उभे केले की बालमनावर त्याचा दीर्घकालीन परिणाम होतो. आणि संस्कार म्हणजे तरी वेगळे काय असतात हेच ते संस्कार !त्यामुळे आम्ही शाळेत नेहमीच अभिनव प्रयोग करत असतो. त्यामुळेच राजमाता जिजाऊ जयंती निमित्त राजमातांनी शिवबाला कशा पद्धतीने वाढविले ,शिवबांचे मावळे, राजमातांनी शिवबाकडून सोन्याचा नांगर करून कशा पद्धतीने जमिनीची नांगरणी केली. शिवाजी महाराजांनी स्वतःचा परगणा कशा पद्धतीने स्थापन केला. मावळ्यावर असलेले त्यांचे प्रेम. हे सर्व आम्ही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वेशभूषा आणि संवादाच्या माध्यमातून स्वतःच करून दाखविले .
तसेच विवेकानंद यांचेही चरित्र विद्यार्थ्यांसमोर उलगडण्याचा प्रयत्न केला. विवेकानंदांच्या आई भुवनेश्वरी देवी त्यांना ज्या रामायण आणि महाभारतातल्या कथा वाचून दाखवत होत्या त्याही कथा मुलांनी सांगितल्या. चित्र प्रदर्शन आयोजित केल्यामुळे मुले यामध्ये रंगून गेली होती. मुळात प्राथमिक वर्गाची मुले ही अत्यंत लहान वयाची असल्यामुळे त्यांना अशा उपक्रमात गुंतवून ठेवल्यामुळे मुलांनीही अतिशय सुंदर असा प्रतिसाद देऊन हे सर्व काही समजून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी शाळेतील शिक्षक निशा आहेर, प्रभावती अंगरखे, वैशाली घोडके, वंदना मसने, सुदेशना लोकरे आणि सुहास कपाळे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता काळे यांनी केले. तर आभार उषा जोशी यांनी मानले.