धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहर पोलिस ठाण्यासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून सात ते आठ युवकांनी दुपारी 12 वाजल्यापासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन चालू केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला 302 कलम लावा व मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या या प्रमुख दोन मागण्यांसाठी सोमवार दि. 13 जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आले.
शहर पोलिस ठाण्याच्या समोरील पाण्याच्या टाकीवर अक्षय नाईकवाडी, अमोल जाधव, आबा वायकर, अशोक बनसोडे, निखील जगताप, राज निकम, तेजस बोबडे, संकेत सुर्यवंशी आदींनी 150 फुट उंच असलेल्या टाकीवर जावून वाल्मिक कराड वर 302 कलम लावा, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. या प्रमुख मागणीसाठी आंदोलन चालू केले. आंदोलन चालू असतानाच दुपारी उन्हामुळे तेजस बोबडे यास चक्कर आली. तो टाकीवरच खाली झोपून राहिला. त्यानंतर आपतकाली यंत्रणा पोलिसांनी बोलावली. यामध्ये आरोग्य विभागीतील डॉक्टर व सेवक बोलविण्यात आले. तेजस बोबडे यास सलाई टाकीवर जावून लावण्याची मागणी आंदोलकांनी केली. परंतु आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी टाकीवर जाण्यास नकार दिला. उपस्थित असलेल्या काही आंदोलकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुलावर रस्तारोको केला. त्यानंतर डीवायएसपी राठोड, आरोग्य विभाग व आंदोलनकर्ते यांच्यात चर्चा होवून टाकीवर जावून तेजस बोबडे यास सलाईन लावण्यात आले. त्यानंतरही टाकीवरील आंदोलन सांयकाळपर्यंत चालूच होते. रास्तारोको मात्र थांबविण्यात आला.