भूम (प्रतिनिधी)- माहे सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टी अनुदानातून 243 परांडा विधानसभा क्षेत्रातील भूम तालुका संपूर्ण वगळला असून परांडा तालुक्यातील फक्त 2 महसूल मंडळांचा समावेश झालेला आहे. वास्तविक पाहता सगळीकडेच अतिवृष्टी झालेली असल्याने तिन्ही तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मंजूर करावे. ज्या महसूल मंडळांना अनुदान मंजूर झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना ते अनुदान तत्काळ वाटप करण्यात यावे. असे पत्र परांडा, भूम, वाशीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,जिल्हा कृषी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी भूम यांना दिले.
अतीवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हांगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हांगामात एक वेळेस याप्रमाने राज्य आपत्ती प्रतीसाद निधी मधून विहीत दराने मदत देण्यात येते. यानुसार शासन निर्णयाप्रमाणे धाराशिव जिल्ह्यासाठी 221 कोटी अनुदान मंजूर झालेले आहे. परंतु हे अनुदान अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना वाटप झालेले नाही. आणि संपूर्ण भूम तालुक्यात आणि जवळा आणि पाचपिंपळा अशी 2 महसूल मंडळे वगळून संपूर्ण परांडा तालुक्यात 65 पेक्षा कमी पर्जन्यमान झालेली आहेत. अशी नोंद प्रशासनाने दाखवली आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की माहे सप्टेंबर 2024 मध्ये संपूर्ण भूम -परांडा-वाशी अशा तिन्ही तालुक्यामध्ये 65 पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. प्रशासनाच्या सदोष पर्जन्यमापक यंत्रणेमुळे याची नोंद योग्य पध्दतीने झालेली नाही. यामुळे संपूर्ण भूम तालुक्यातील आणि 2 महसूल मंडळे वगळून संपूर्ण परांडा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.
तरी पत्राद्वारे राहुल मोटे अशी विनंती केली आहे की ज्या शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना तत्काळ त्यांचे पैसे वाटप करण्यात यावेत. तसेच अनुदानातून वगळलेल्या संपूर्ण भूम तालुक्यातील आणि 2 महसूल मंडळे वगळून संपूर्ण परांडा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करून तिन्ही तालुक्यातील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना हे अनुदान मंजूर करून सहकार्य करावे. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.