धाराशिव (प्रतिनिधी)- तहसीलदार धाराशिव यांच्या विरुद्ध उपविभागीय अधिकारी धाराशिव यांना दप्तर तपासणीच्या दरम्यान चौकशी अहवालातील गंभीर आढळलेल्या नोंदी व केलेल्या अनियमित ते बाबत संपूर्ण चौकशीही उपविभागीय अधिकारी धाराशिव यांच्याकडून होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या उपस्थितीमध्ये  जिल्हाधिकारी यांना आज ( दि.03) निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये तहसीलदार धाराशिव यांच्याबाबत उपविभागीय अधिकारी धाराशिव यांनी दप्तर तपासणीच्या वेळेस त्यांच्या निदर्शनास तहसीलदार धाराशिव यांनी गंभीर केलेल्या नोंदी व अनियमितता  निदर्शनास आल्या आहेत. त्या नोंदी या निवेदनामध्ये मांडल्या. धाराशिव तालुक्यातील उपळा,शेकापूर या गावांमध्ये तहसीलदार यांना अधिकार नसताना लेआउट मंजुरी दिली आहे. ग्रीन झोन असलेल्या क्षेत्रातील लेआउट मंजूर केले आहेत. लेआउट मंजूर नसताना दहा टक्के खुली जागा व दहा टक्के आणि ॲमेनिटीज स्पेस सोडला नाही. दहा टक्के क्षेत्रातही प्लॉट पाडले आहेत.स्थानिक प्राधिकरणाची जागा विकासकास विक्री केली आहे. महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने ना- हरकत घेता लेआउटला परवानगी दिली आहे. यामुळे उच्च दाब वाहिनीखाली लेआउट मंजूर केले आहेत. यामुळे भविष्यात जीवित हानी होण्याची शक्यता आहे. अ-कृषीच्या कोणत्याही संचिकेवर नायब तहसीलदार यांची स्वाक्षरी नाही. गौण खनिज च्या संचिकेत कार्यकारी अभियंता यांनी 1000 ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी मागितली आहे. तहसीलदार यांनी त्यांच्या स्तरावर 500 ब्रास उत्खननाची परवानगी दिली आहे. उर्वरित 500 ब्रास मुरूम विनापरवाना उत्खनन झाल्याचे दिसते. वर्ग दोन चा सातबारा एडिट करून वर्ग एक करून लेआउट मंजूर केले आहेत. त्याची चौकशी करणे बाकी आहे. चौकशी समितीला संचिका देण्यास नकार दिला शिवाय कारणे दाखवा नोटीस बजावली असता त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला. 

तहसीलदार धाराशिव यांच्याबाबत सर्व गंभीर बाबींची चौकशी करणे अजून बाकी असून त्यामुळे उपविभागीय अधिकारी धाराशिव यांच्याकडूनच संपूर्ण चौकशी करणे गरजेचे असून त्यामुळे पारदर्शकपणे संपूर्ण चौकशी अहवाल येईल. त्यानंतर सत्य बाहेर येईल. सदर उपविभागीय अधिकारी धाराशिव यांनी तहसीलदार धाराशिव यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये एफ.आय.आर दाखल केलेला आहे किंवा नाही याबाबत आपल्याकडून कार्यवाही करण्यात यावी. तहसीलदार धाराशिव यांची तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची दप्तर तपासणी ही उपविभागीय अधिकारी धाराशिव यांच्याकडूनच चौकशी करण्यात यावी. अंतिम चौकशी अहवाल आल्यानंतर दोषी आढळलेल्या धाराशिव तहसीलदार सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. गेले तीन दिवस महसूल कर्मचारी, अधिकारी केलेला बेकायदेशीर केलेला संप नियमात बसतो का, केलेल्या संपामुळे जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी तसेच परीक्षेकरता बसलेले परीक्षार्थींना झालेला त्रास, विविध दाखले काढणी बाबत नागरिकांना झालेला त्रास असून बेकायदेशीर केलेला संप नियमात बसत नसेल तर बेकायदेशीर संप केलेल्या महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. त्यांच्या सर्विस बुक मध्ये लाल शाईने नोंद घेण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

अशा स्वरूपाची निवेदनाची एक प्रत  ना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री,  अजित पवार उपमुख्यमंत्री अर्थ व नियोजन व राज्य उत्पादन शुल्क मंत्री,  चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, प्रधान सचिव महसूल महाराष्ट्र शासन, मा.विभागीय आयुक्त संभाजीनगर, उपविभागीय अधिकारी धाराशिव यांना या निवेदनाची एक प्रत देण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांच्यासोबत जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दिन मशायक,प्रदेश संघटक सचिव खलील पठाण, भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप, धाराशिव उस्मानाबाद कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे,  धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, परंडा तालुकाध्यक्ष अमोल काळे, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, लोहारा शहराध्यक्ष आयुब शेख, जिल्हा उपाध्यक्ष अण्णा भोगील, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, तुळजापूर तालुका उपाध्यक्ष सुधीर मगर, धाराशिव शहर कार्याध्यक्ष अकबर पठाण, परंडा तालुका सदस्य धर्मराज गटकुळ  अतिष हरभरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.

 
Top