तुळजापूर (प्रतिनिधी)- कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवातील जलयात्रेच्या सोहळा शनिवार दि. 11 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात  पारंपरिक पध्दतीने संपन्न झाला.

 शनिवार दि.11 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता पापनाश तीर्थ कुंडातील पवित्र जल व  इंद्रायणी देवीचे पुजन करुन या जलयाञा सोहळ्यास आरंभ झाला. या जलयात्रेनिमित्त शाकंभरी नवरात्र उत्सव देवीच्या प्रतिमेची खास सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संभळाचा कडकडाट तसेच विविध धार्मिक वाद्यांसह आई राजा उदो..ऽऽ च्या जयघोषाने तुळजाईनगरी दणाणून गेली होती. जलयात्रा मार्गावर संस्कार भारतीच्या वतीने काढण्यात आलेल्या आकर्षक रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. या जलयात्रेच्या अग्रभागी चौघडा, बॅण्ड पथक, नगारा, संभळ आदी धार्मिक वाद्यांसह आराधी व भजनी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  या जलयात्रा सोहळ्यानिमित्त हत्ती, उंट, घोडे आदींचा आग्रभागी सहभाग करण्यात आला होता. 

या जलयात्रेत यजमान विवेक गंगणे व त्यांच्या पत्नी प्रियंका गंगणे जलकुंभ घेवून सहभागी झाल्या होत्या. तसेच आामदार राणाजगजितसिंह पाटील, महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, महंत वाकोजीबुव,  सिध्देश्वर इंतुले, अमोल भोसले, अतुल ढमाले, राजेश्वर वाले, अतुल राजकुमार, भोसले, प्रशांत चव्हाण, आदमाने, गणेश मोटे, विपीन शिंदे, प्रा धनंजय लोंढे, विनोद गंगणे, सचिन रोचकरी आदीसह सेवेकरी पुजारी, भाविक मोठ्या संखेने सहभागी झाले होते.

जलयात्रा विवेकानंद नगर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भवानी रोडमार्गे मंदिरात पोहचली. त्यानंतर सुहासिनी व कुमारिकांनी कलशातील पवित्र जलाने संपूर्ण मंदिर परिसर धुवून स्वच्छ केला. यात मुख्य महंत तुकोजी बुवा, चिलोजीबुवा यांनीही सहभाग नोंदविला. त्यानंतर सहभागी सर्व सुहासिनी व कुमारिकांचा मंदिर संस्थानच्या वतीने ओटी भरुन सन्मान करण्यात आला. या सोहळ्यानंतर देवीची भाविकांची पंचामृत पूजा पूर्ण होवून नित्योपचार पुजेनंतर सिंहासनावर भवानी अलंकार महापूजा मांडण्यात आली. या सोहळ्यात उस्मानाबादसह सोलापूर, बीड, लातूर जिल्ह्यातील सुहासिनी व कुमारिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


प्रक्षाळ मंडळातर्फे अन्नदान

येथील मंहत तुकोजीबुवा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या प्रक्षाळ मंडळातर्फे पापनाश तिर्थकुंड ते येथे जलयात्रेत सहभागी सुवासनी, कुमारीकांना कलश, श्रीफळ व आंबेपान वाटप करण्यात आले. त्यानंतर राजेशहाजी महाद्वारसमोर पंच पकवान असलेले सुमारे दहा हजार भाविक भक्तांना भोजन ने देवून अन्नदान करण्यात आले. जल यात्रेतील मिरवणुकीच्या सोहळ्याचा अन्नदान मंगल कलश बॅण्ड वाहन याचा खर्च प्रक्षाळ यडीखेत उपक्रम यशस्वीतेसाठी मंहत प पु तुकोजी बुवा यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.


 
Top