धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात रस्ता सुरक्षा अभियान 2025 यशस्वीरित्या संपन्न झाले. महामार्ग पोलीस केंद्र, धाराशिव, सर्वज्ञ प्रकाशन, पुणे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने 'रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक नियमांचे मार्गदर्शन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन एम. जी. शेख, मोटार वाहन निरिक्षक, आरटीओ कार्यालय, धाराशिव, सचिन बेंद्रे, सहाय्यक निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, धाराशिव, प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंत पाटील, संचालक, सर्वज्ञ प्रकाशन संस्था, पुणे, उदयसिंह रामराव पाटील, प्राथमिक पदवीधर, जिल्हा परिषद, धाराशिव, बोलक्या बाहुल्या कलाकार, निशिकांत शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र, धाराशिव यांची प्रमुख उपस्थिती व्यासपीठावर होती. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनात सदर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
निशिकांत शिंदे, महामार्ग पोलीस केंद्र यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रस्ता सुरक्षा अभियान संकल्पनेचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला. रस्ता सुरक्षा नियम पाळल्यास अपघात टाळता येतील. ड्रायव्हिंग करत असतेवेळेस वेग मर्यादा पाळणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
प्रमुख अतिथी, एम. जी. शेख, मोटार वाहन निरिक्षक, आरटीओ कार्यालय, धाराशिव यांनी लायसन्स विषयी मार्गदर्शन केले. लायसन्स शिवाय गाडी चालवणे धोकादायक आहे. ड्रायव्हिंग करतांना मन शांत असावे. मनामध्ये कोणतेही ताणतणाव नसावेत. ड्रायव्हिंग करत असतेवेळेस, परवानगी दिल्याशिवाय ओव्हरटेक करु नये, असे मार्गदर्शन त्यांनी केले. उदयसिंह रामराव पाटील, बोलक्या बाहुल्या कलाकार, यांनी हसमुखराव, वाहतूक पोलीस अधिकारी, माध्यमातून रस्ता सुरक्षा विषयी सखोल व विस्तृत माहिती दिली. ड्रायव्हिंग करत असतेवेळेस सर्व कागदपत्रे, लायसन्स, आर. सी. बुक, टॅक्स इन्शुरन्स जवळ ठेवावीत. प्रत्येक चालकाने स्वाभिमानी असावे, पण अभिमानी असु नये. उत्तम ड्रायव्हर बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ड्रायव्हिंग करतांना फाजील आत्मविश्वास नको. ड्रायव्हिंग करतांना संयम पाळा. ड्रायव्हिंग करत असतांना चिन्ह फलक, तसेच माहिती पत्रक बघितले पाहिजे. लायसन्स प्रत्येकाने काढले पाहिजे, इ. महत्वपूर्ण माहितीतून जनजागृती केली.
प्रमुख मार्गदर्शक वसंत पाटील यांनी सुरक्षित ड्रायव्हिंग विषयी मार्गदर्शन केले. रस्ता बदलतेवेळेस सिग्नल बरोबरच इशारा देखील दिला पाहिजे. सुरक्षित ड्रायव्हिंग सर्वांनी सजगतेने केले पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष इंग्रजी विभागातील प्राध्यापक, समन्वयक, कमवा व शिका योजना, डॉ. गोविंद कोकणे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात रस्ता सुरक्षेचे महत्व स्पष्ट केले. विकासाबरोबरच सुरक्षिततेची जबाबदारी पुर्ण करणे अनिवार्य आहे. विकसित समाजाबरोबरच सुसंस्कृत समाज निर्माण करण्यात शिक्षण व सुरक्षा व्यवस्थेचे महत्व आहे. शिक्षण, प्रशिक्षणातून सर्व प्रश्न सोडविण्यास मदत होते, असे त्यांनी म्हटले. पोलीस हवालदार अमोल खराडे यांनी उपस्थित सर्वांना रस्ता सुरक्षा शपथ दिली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी जितेंद्र शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मेघश्याम पाटील यांनी आभार मानले.