धाराशिव (प्रतिनिधी)- समाजामध्ये प्रत्येक जण शिक्षित असला तरीही ठराविक व्यक्तिमत्त्वाचीच छाप ही समाजावर पडते. कारण ज्यांना आपले विचार प्रगल्भपणे समाजासमोर मांडता येतात त्याच लोकांना समाज लक्षात ठेवतो. आणि असे विकसित व्यक्तिमत्व घडविण्यात अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर पुस्तकांचा खूप मोठा वाटा असतो .असे प्रतिपादन येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल तथा लेखिका आणि कथाकार प्रा.सुनीता गुंजाळ यांनी केले. 

डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणेरे यांनी राबविलेल्या “वाचन संकल्प महाराष्ट्राचा“ या अभियाना अंतर्गत त्या बोलत होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, कार्यक्रम समन्वयक व बेसिक सायन्स अँड हुमानिटीच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. उषा वडणे, प्रा. नाईकवाडी, प्रा. वर्षा पाटील, प्रा. आरती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 या अभियाना अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025  या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा “ हे अभियान राबविले जात असून यामध्ये महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावरचे विद्यार्थी तसेच कर्मचारी यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर पुस्तकांचे वाचन करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा देण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर सद्या अनेक उपक्रम राबविले जात आहेत.  याचाच एक भाग म्हणून येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा“ या उपक्रमाअंतर्गत  ' कथन “ या विषयावर प्रा. सुनीता गुंजाळ बोलत होत्या.

 यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की समाजामध्ये अनेक इंजिनियर्स, डॉक्टर्स , उच्चपदस्थ अधिकारी आहेत पण जे अवांतर वाचन करून स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करतात त्यांची समाजावर एक वेगळीच छाप पडलेली दिसून येते. प्रत्येक  वाचक हा नेता होत नाही पण प्रत्येक नेता हा उत्कृष्ट वाचक असतो. हे आपण निरीक्षण केल्यावर सहज लक्षात येईल. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचन केले पाहिजे. वाचनाच्या सवयीमुळे आपण  दुःखापासून सुद्धा दूर होऊन पुस्तकांच्या दुनियेमध्ये हरवून जातो आणि पुस्तक आपले कधी मित्र बनतात हे आपल्यालाही कळत नाही.  या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की सध्याची पिढी ही मोबाईल तसेच इंटरनेट माध्यमातून भरकटत असून अवांतर वाचन हे खूप कमी झालेले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक विकाराला बळी पडत आहे.त्यांना वेळीच सावरणे गरजेचे आहे. त्यामुळेच विद्यापीठ स्तरावरून हे उपक्रम राबविले जात आहेत.  प्रत्येकाने अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन करावे हे यामध्ये अपेक्षित आहे.  यावेळी कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा वडणे म्हणाल्या की अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे निश्चितपणे हुशार असतात ,टेक्निकल गोष्टीमध्ये सक्षम असतात त्यामुळे माध्यम कुठलही वापरा पण वाचनाची आवड ही मनापासून जोपासली पाहिजे. पुस्तके सहज उपलब्ध होतात ती विकत घेऊन सुद्धा प्रसंगी वाचली पाहिजेत.

*यावेळी विद्यार्थ्यांनी वाचलेल्या अनेक पुस्तकांचे रसग्रहण करून कथन करण्याचा प्रयत्न केला त्याचे संकलनही महाविद्यालयीन स्तरावर केले जात आहे*

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा पाटील यांनी केले तर आभार प्रा.आरती शिंदे यांनी मांनले.  या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top