तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी मंदिर परिसरात अवैधरित्या पार्क केलेल्या वाहनांवर आज मंदिर प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने कडक दंडात्मक कारवाई केली.
मंदिर परिसरातील भवानी रोडवर, श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीसमोर तसेच प्रवेशद्वाराजवळ नो पार्किंग झोन असताना रस्त्याच्या मध्यभागी अवैधरीत्या नो पार्किंग झोनमध्ये दुचाकी पार्क केलेल्या असल्यामुळे पादचारी भाविकांसह स्थानिक नागरिक व कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापन श्रीमती माया माने यांनी याबाबत आदेश दिल्यानंतर संस्थानच्या सुरक्षा विभागाकडून पोलिसांच्या मदतीने एकूण 22 दुचाकींवर मोटर व्हेईकल ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांबरोबर मंदिराचे कंत्राटी सुरक्षा कर्मचारी, कंत्राटी कंपनीचे सुपरवायझर, संस्थानचे सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक ऋषभ रेहपांडे उपस्थित होते.
इथून पुढे ही कारवाई नियमित केली जाणार असून यापुढे परिसरातील पार्किंगची परवानगी नसलेल्या ठिकाणी तसेच मंदिर प्रशासकीय इमारतीसमोर वाहने लावू नयेत असे आवाहन मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले.
महाद्वारासमोरील अतिक्रमणे हटवली
मंदिराच्या महाद्वारासमोर अनेक पथविक्रेत्यांनी अवैधरित्या अतिक्रमण केल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील ही अतिक्रमणे देखील मंदिर संस्थानने पूर्णपणे हटवली असून पुन्हा अतिक्रमणे केल्यास कडक कारवाईचा इशारा मंदिर संस्थान प्रशासनाकडून देण्यात आला आहे.