धाराशिव (प्रतिनिधी)- यवतमाळच्या टिपेश्वरमधून धाराशिवच्या येडशी अभयारण्यात आलेला वाघ रेस्क्यू टीमच्या टप्प्यात आहे. परंतु, हाती लागत नाही. या वाघाने धाराशिव, बार्शी आणि वाशी अशा तीन तालुके पिंजुन काढले आहे. या वाघाने बार्शी तालुक्यातील उक्कडगाव शिवारात शुक्रवारी सायंकाळी जनावरावर हल्ला केला होता.उक्कडगाव येथे शुक्रवारी वाघाने तीन जनावरांचा फडशा पाडला. रेस्क्यू टीमने त्या ठिकाणी जाऊन ट्रॅप कॅमेरे लावले. परंतु वाघाने रस्ता बदलला. शनिवारी हा वाघ पुन्हा वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी शिवारात आल्याचे वनविभागाला समजले. पुन्हा रेस्क्यू टीम कडकनाथवाडी येथे दाखल झाली. रेस्क्यू टीमने मंगळवारपासून (दि.14) वाघाचे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
पहिले तीन दिवस रेस्क्यू टीमने वाघाचा शोध घेऊन अभ्यास केला. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि रेस्क्यू टीम दररोज 20 ते 22 किलोमीटरची पायपीट करत आहेत. उक्कडगाव येथे वाघाने तीन शिकार केल्यानंतर पंधरा तासांपेक्षा अधिक काळ रेस्क्यू टीमने पाळत ठेवली. परंतु, वाघ हाती लागला नाही. वन विभागाचे एकूण 70 कर्मचारी वाघाला शोधण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून वाघ पुढे आणि रेस्क्यू टीम मागे असा प्रकार सुरू आहे. वाघ टप्प्यात असला तरी वाघाला जेरबंद करण्यासाठी योग्य जागेचा निवड करावी लागणार आहे. नागरी वस्तीच्या आसपास वाघाला जेरबंद करणे कठीण असल्याचे रेस्क्यू टीमचे म्हणणे आहे. रेस्क्यू टीमचे शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी वाघाने मात्र या पथकाची पुरती दमछाक केल्याचे दिसत आहे.
त्यातच वैराग परिसरात बिबट्याने थैमान घातले आहे. वाघ आणि बिबट्याचा संचार तीस किलोमीटरच्या परिघात आहे. सध्या वाघाचा शिकारीसाठी बार्शी तालुका आणि विश्रांतीसाठी धाराशिव आणि वाशी तालुका असा प्रवास सुरू आहे.