धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील कोट्यावधी रूपयांच्या बोगस पीक विमा घोटाळा प्रकरणात विमा भरलेले 565 शेतकरी दोषी असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पोलिस अधीक्षक संजय जाधव यांना पाठविला आहे. बोगस पीक विमा प्रकरणी ऑनलाईन केंद्र चालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र या घोटाळ्यात विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना आरोपी न करता अभय देण्यात आल्याचा आरोपी आमदार सुरेश धस यांनी केला आहे. शेतकरी यांना सुध्दा आरोपी करावे अशी त्यांची मागणी असून, जिल्हाधिकारी यांच्या समितीने शेतकरी दोषी असल्याचा अहवाल दिल्याने शेतकऱ्यांना सह आरोपी करणार की स्वतंत्र गुन्हा नोंद होणार हे पाहावे लागेल. भाजप आमदार सुरेश धस यांनी विधीमंडळात आवाज उठवला आहे. तर धाराशिव येथील जनआक्रोश मोर्चात राज्यात बोगस पीकविमा भरला जात असल्याचा आरोपी केला होता. राज्यातील बोगस पीकविमा घोटाळ्याचा केंद्रबिंदू हे परळी येथे आहे.

दोषी सापडलेले शेतकरी हे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, कर्नाटक राज्यातील बिदर, लातूर, नांदेड, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, रायगड, सातारा, सोलापूर या 14 जिल्ह्यातील आहेत. या शेतकऱ्यांनी धाराशिव जिल्ह्यातील भूम, कळंब, तुळजापूर, लोहारा, धाराशिव, वाशी तालुक्यातील शासकीय जमिनीवर ऑनलाईन अर्ज करीत विमा भरला होता. 565 पैकी तब्बल 454 शेतकरी हे एकट्या बीड जिल्ह्यातील असून, 37 शेतकरी लातूर, 14 

धाराशिव जिल्ह्यातील आहेत. शेतकऱ्यांनी गायरान, संपादित तलाव, वन विभागाची जमीन ते चक्क कॅनल, सडक, महाराष्ट्र शासन मालकीच्या जमिनीवर विमा भरला होता. 

धाराशिव जिल्ह्यातील शासकीय 2 हजार 994 हेक्टर शेत जमीन स्वतःची आहे असे दाखवून 565 शेतकऱ्यांनी 1 हजार 170 अर्जाद्वारे ऑनलाईन पीकविमा काढला होता. त्यापोटी सरकारने 3 कोटी 13 लाख रूपयांचा वाटा हिस्सा म्हणून पीक विमा हप्ता भरला. 15 कोटी 68 लाख रूपयांचा पीकविमा मिळावा यासाठी या सगळ्यांनी कट रचून फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हा कृषी अधीक्षक रविंद्र माने व त्यांच्या टीमने या प्रकरणाची व प्रत्येक अर्जाची चौकशी केली. त्यानंतर कृषी उपसंचालक बाबासाहेब वीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 7 एप्रिल 2024 रोजी 24 जणांवर आनंदनगर पोलिस ठाण्यात कलम 420 नुसार गुन्हा नोंद झाला. त्यातील 24 पैकी 16 आरोपी परळी तालुका व हेळंब गाव बीड जिल्ह्यातील आहेत. 24 पैकी 19 आरोपींना अटक करण्यात आले असून, 15 जणांना अटक करून नियमित तर 4 जणांचा अटकपूर्व जामीन झाला आहे. 


 
Top