धाराशिव (प्रतिनिधी)- बांधकाम विभागने अतिक्रमण हटविण्याची सुत्रे ताब्यात घेत शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरूवात केली. शहरातील मुख्य रस्ता असलेल्या आयुर्वेदिक महाविद्यालय ते तेरणा कॉलेजपर्यंतचे अतिक्रमण हटावची मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी आयुर्वेदिक महाविद्यालय ते शिवाजी चौकापर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजुने नाकाकाम होणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागानेच व्यापाऱ्यांना सांगून अतिक्रमण काढण्यास सांगितले. जे काढत नव्हते ते अतिक्रमण हटवण्यात आले. दुभाजकापासून 15 मीटरपर्यंतचे सर्व अतिक्रमण काढण्यात येत आहे. गुरूवारी पोलिस बंदोबस्तात दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टरच्या माध्यमातून अतिक्रमण हटविण्यात आले.

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ते तेरणा महाविद्यालय दरम्यानच्या रोडवर विविध शासकीय कार्यालये, आडत, मध्यवर्ती बसस्थानक, वाहनांचे शोरूम आहेत. शिवाय वाहनांसाठी शहरातील प्रमुख मार्गही हाच आहे. त्यामुळे रोडवर कायम वर्दळ असते. शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजुला दुकानदारांकडून झालेली अतिक्रमणे, शिवाय फेरीवाले, भाजीपाल्यांसह फळविक्रेत्यांसह इतर छोट्या, मोठ्या विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. दुकानांसमोरही वाहने उभी केली जात असल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागते. विशेष म्हणजे अनेक शासकीय कार्यालयाचे कंपाऊंडवॉल हे अतिक्रमणामध्ये येते. यासंदर्भात काय कारवाईत होते. याकडे लक्ष लागले आहे. अतिक्रमण हटाव पथकाने गुरूवारी सकाळपासून रस्त्याच्या दोन्ही बाजुचे 15 मीटर अंतर मोजून अतिक्रमण काढले. तसेच पंधारा मीटर अंतरापर्यत रंगाने खुणा केल्या. 15 मीटरच्या अंतरात ज्यांची दुकाने, कट्टे वा दुकानातील साहित्य येत होते ते काढण्यास सांगितले. 


 
Top