कळंब (प्रतिनिधी)-  न.प. ने अगोदर मूलभूत सुविधा  द्याव्यात आणि मगच करांची वसुली करावी, तसेच लावलेले दोन टक्के मासिक व्याज माफ करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक सतीश टोणगे यांनी केली आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यापासून बाजारपेठा थंड आहेत. व्यापारी वर्गाकडे ग्राहक नाही, तसेच न. प.कडून नागरिकांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. शहरातील प्रत्येक भागात कचऱ्याचे ढिगारे आहेत. नाल्यांची साफसफाई होत नाही, घंट्या गाड्या फिरत नाहीत. धनेगाव धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अंधाराचे साम्राज्य आहे. व्यापाऱ्यांच्या दुकानापुढे गाड्यांची रांग असते, त्या मुळे ग्राहक येत नाही. पार्किंगची सोय करण्यात यावी अशी अनेक दिवसांपूर्वीची मागणी आहे. कसल्याही सुविधा उपलब्ध नसताना न. प.चे कर्मचारी मात्र रजाकारी पद्धतीने करांची वसुली करत आहेत. थकबाकी, चालू बाकी न भरल्यास नोटीस देऊन त्यावर शहरात बोर्ड लावून बदनामी करण्याची भाषा बोलत आहेत,“ कर भरा नाहीतर बदनामीला सामोरे जा“ अशी पद्धत अवलंबली जात आहे. मुख्याधिकारी यांनी शहरातील नागरिकांना अगोदर मूलभूत सुविधा द्याव्यात आणि मगच करांची वसुली करावी अशी मागणी माजी नगरसेवक सतीश टोणगे यांनी करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 
Top