सोलापूर (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने अधिकाधिक मालवाहतुकीच्या सेवांमधून महसूल निर्माण करण्याच्या हेतूने मोलॅसिस मालवाहतुकीला पुनरुज्जीवित केले आहे.यामुळे मालवाहतूक व्यवसाय वाढवण्यासाठी सोलापूर रेल्वे विभागाच्या सक्रिय प्रयत्नांवर प्रकाश टाकला जातो.
डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 (जवळपास 30 दिवस) या एका महिन्यात सोलापूर विभागाने तीन मोलॅसिस रेकची यशस्वीरित्या लोडिंग केली आहे.
महाराष्ट्रातील पंढरपूर गुड्स शेड पासून दक्षिण रेल्वेचा भाग असणाऱ्या तामिळनाडूतील नेल्लीकुप्पम पर्यंत दोन, महाराष्ट्रातील बाळे गुड्स शेड पासून दक्षिण रेल्वे तील तामिळनाडूतील कुंभकोणम पर्यंत एक असे एकूण 3 रेकी लोडींग झाले असून यातून रेल्वेला 1.69 कोटींचा अतिरिक्त महसूल मिळाला आहे.
साखर उत्पादनाचे उप-उत्पादन असलेले मोलॅसिस हे विविध उद्योगांसाठी एक महत्त्वाची वस्तू आहे. मोलॅसिसची नव्याने करण्यात आलेली वाहतूक हि सोलापूर विभागाच्या मालवाहतूक विभागाला बळकटी देण्यासाठी आणि औद्योगिक वाढीला पाठिंबा देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते.
व्यवसाय विकास उपक्रमांतर्गत वाणिज्य विभागाने भागधारकांशी संवाद साधण्यासाठी, कार्यक्षम लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी आणि ग्राहक-अनुकूल उपक्रम करण्यासाठी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. मोलॅसिसचे यशस्वी लोडिंग हे विभागाच्या अखंड समन्वय आणि कार्यक्षमतेचे प्रमाण आहे.
तरी सोलापूर विभागाकडून देण्यात येणाऱ्या मालवाहतूक सेवांचा वापर करण्याचे आवाहन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री योगेश पाटील यांनी व्यवसाय आणि उद्योजकांना केले आहे. विविध वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी, वेळेवर आणि त्रासमुक्त वितरण सुनिश्चित करण्यासाठी विभाग विश्वासार्ह, किफायतशीर आणि कार्यक्षम लॉजिस्टिक्स उपाय प्रदान करतो यावर त्यांनी भर दिला.
सोलापूर विभाग नवीन संधी शोधण्यासाठी, मालवाहतूक ऑपरेशन्स वाढवण्यासाठी आणि विभागाच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी समर्पित आहे. मोलॅसिस वाहतुकीचे पुनरुज्जीवन हे उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे आहे.