धाराशिव (प्रतिनिधी)- 31 डिसेंबर ते 7 जानेवारी 2025 दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली. त्यात एकूण वैद्यकीय व्यावसायिकाची संख्या 449 असून, योग्य अर्हता असलेले वैद्यकीय व्यावसायिक 341 असून, 158 वैद्यकीय व्यावसायिकांच्या पदव्यांमध्ये त्रुटी आढळली आहे.
तसेच तपासणीवेळी 79 दवाखाने बंद होते. त्रुटी आढळलेल्या डॉक्टरांना 30 दिवसात पुर्तता करण्याची नोटीस बजावली आहे. त्रुटींची पुर्तता न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने खबरदारी घेत जिल्ह्यातील बागेस डॉक्टरांचा शोध घेत त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी अनधिकृत वैद्यकीय व्यावसयिक (बोगस डॉक्टर) शोध समिती जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा, तालुका, नगरपालिका व नगरपरिषद स्तरावर शासन नियमानुसार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आपल्या कार्याक्षेत्रातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेत शासन नियमानुसार योग्य कार्यवाही करण्याचे आदेश बैठकीत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिले. ॠर्व वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र, आरोग्य अधिकारी उपकेंद्र, आरोग्य कर्मचारी व ग्रामविस्तार अधिकारी यांना कार्याक्षेत्रातील बोगस वैद्यकीय व्यावसायिक आढळल्यास प्रशासनास माहित देण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी सदाशिव हरिदास यांनी दिले होते.