मुरूम (प्रतिनिधी)- भुसणी, ता. उमरगा येथील सिद्धाप्पा बिराप्पा गाडेकर यांचा 100 वा वाढदिवस हडपसर (पुणे) येथे त्यांच्या कुटुंबीयांकडून नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या या मेंढपाळाने 60 वर्षे भुसणी परिसरात रानावनात फिरून ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता मेंढ्या राखण्याचे काम केले. त्यांच्या जीवन प्रवासाने सर्वांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते आहे. एका गरीब पण जिद्दी मेंढपाळाने आपल्या आयुष्याच्या 100 व्या वर्षात पदार्पण करताना आपल्या मेहनतीच्या आणि संघर्षमय जीवनाचा प्रवास उजळून टाकला. त्यांच्या शताब्दी वाढदिवसानिमित्त गाडेकर कुटुंबीयांकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संघर्षातून यशाकडे प्रवास. सिद्धाप्पा गाडेकर यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. परिस्थिती अत्यंत बिकट होती, पण त्यांनी हार न मानता मेंढ्यांची देखभाल करत आणि त्यातून आपला उदरनिर्वाह करत आयुष्य घडवले. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत स्वतः चे कुटुंब एकत्रित ठेवले आहे. आज जवळपास कुटुंबामध्ये शंभर सदस्य आहेत. अशी उदाहरणे दुर्मिळ आहेत. सिद्धाप्पा गाडेकर उर्फ आप्पा हे गाव, तालुका व जिल्ह्यात सलग दहा वर्ष कुस्ती पैलवान म्हणून प्रसिद्ध होते. कुटुंबामध्ये अनेक जण उच्चशिक्षित असून विविध व्यवसायामध्ये काम करत आहेत. आपल्या कुटुंबाचा आधार बनण्याच्या जिद्दीने त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गाव व परिसरातील अनेकांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. कुटुंबीयांनी केक कापून त्यांचा पुणेरी पगडी घालून यथोचित सत्कार केला आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

यावेळी या कार्यक्रमास आलेल्या अनेकांनी बिरू गाडेकर हे आमच्या गावासाठी प्रेरणा स्थान आहेत. त्यांच्या जिद्दीमुळेच त्यांनी शंभर वर्षांचा प्रवास यशस्वी केला आहे. उपस्थित मान्यवरांनी दिलेले कौतुकाचे शब्द निश्चितच गाडेकर यांचे जीवन हे येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्श आहे. त्यांनी गरिबीवर मात करत जिद्दीचे उदाहरण घालून दिले आहे. या सत्काराला विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते.


 
Top