धाराशिव (प्रतिनिधी)- पैशाच्या वादातून एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाचा डोक्यात दगड घालून खून केला होता. बुधवारी दि. 15 जानेवारी 2025 रोजी या प्रकरणाचा निकाल धाराशिवच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने (क्र.3) यांनी दिला असून,खून करणारा शिक्षक धीरज हुंबे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच 10 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
धाराशिव शहरातील कुरणे नगर, बार्शी रोड येथे राहणारे धीरज बाबु हुंबे (43 वर्षे) व शेजारी राहणारे शामराव उत्तमराव देशमुख हे श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये शिक्षक या पदावर कार्यरत होते. 21 फेब्रुवारी 2023 रोजी शामराव उत्तमराव देशमुख हे मोटारसायकलवरून आरोपी धीरज हुंबे याच्या घरासमोरून बाहेर जात असताना आरोपी धीरज हुंबे याने शामराव देशमुख यांना पैशाच्या व्यवहारावरून दगडाने डोक्यात मारहाण केली. शामराव देशमुख मोटार सायकलवरून खाली पडले. त्यानंतर आरोपी धीरज हुंबे याने शामराव देशमुख यांना पुन्हा दगडाने डोक्यात मारहाण केली.
यावेळी हजर असलेल्या साक्षीदारांनी शामराव देशमुख यांच्या मुलाला फोनकरून घटनेबाबत माहिती दिली. तो घटनास्थळी आल्यानंतर शामराव यांनी मुलाला घटनेबाबत माहिती सांगितली.मुलाने त्याच्या वडिलास तात्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने ते मयत झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याप्रकरणी आरोपी धीरज बाबु हुंबे याच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 65/2023 भादवि कलम 302 प्रमाणे नोंद करण्यात आला होता. तपासी अंमलदार बी.आर.कांबळे, सहा पोलीस निरीक्षक यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणामध्ये जिल्हा सरकारी वकील महेंद्र बी. देशमुख यांनी एकुण 9 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. सदर प्रकरणामध्ये अभियोग पक्षाच्या वतीने आरोपीची ओळख पटविण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात आली व त्यानुषंगाने साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीने शामराव देशमुख यांना मारहाण केलेल्या घटनेत 8 वर्षाचा बालसाक्षीदार हा प्रत्यक्षदर्शी व इतर एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अभियोग पक्षातर्फे तपासण्यात आले.
सदर प्रकरणामध्ये अभियोग पक्षाच्या वतीने दिलेला पुरावा व जिल्हा सरकारी वकील महेंद्र बी. देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राहृय धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश (क्र.3) व्ही.जी. मोहीते यांनी आरोपी धीरज बाबु हुंबे यास जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. तसेच सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक बी.आर.कांबळे यांनी केलेला असून, कोर्ट पैरवी म्हणून साठे यांनी काम पाहिले.