कळंब (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू सामाजिक संस्था खोंदला ता. कळंब, जि. धाराशिव या संस्थेमार्फत “मी ज्ञानी होणार“ हा सामान्य ज्ञानावर आधारित उपक्रम वर्षभरापासून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील सुमारे 300 शाळांमध्ये सुरू आहे. “मी ज्ञानी होणार“ हा उपक्रम इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मागील पाच वर्षापासून यशस्वीपणे राबवत आहे. 

या उपक्रमांतर्गत दररोज व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून राज्यभरातील सुमारे 300 शाळांना सामान्य ज्ञानाचे दररोज पाच प्रश्न पाठविले जातात सदर प्रश्नांचे शाळेच्या दर्शनी फलकावर आधारित लेखन केले जाते व दुपारच्या सुट्टीमध्ये शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीचे विद्यार्थी सदर प्रश्न वहीमध्ये लिहून घेतात प्रश्नाचे दुसऱ्या दिवशी परिपाठात वाचन घेतले जाते आणि सरावासाठी प्रत्येक महिन्याला संस्थेमार्फत पुरवलेली प्रश्नपत्रिका वापरून एक सराव परीक्षा घेतली जाते. दररोज दिल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञानाच्या पाच प्रश्नांमुळे हा उपक्रम अनेक शाळेमधील विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या आवडीचा उपक्रम बनलेला आहे. या उपक्रमातील सहभागामुळे विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती परीक्षा , सैनिकी स्कूल परीक्षा यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहजच यश संपादन करण्यासाठी मदत मिळणार आहे. या उपक्रमांतर्गतची अंतिम परीक्षा ही दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली असून राज्यभरातील सुमारे 20000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. अंतिम परीक्षेत प्रत्येक शाळेतील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास संस्थेमार्फत आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र आणि शाळेला सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात येते. तसेच राज्यस्तरीय परीक्षेतील गुणानुक्रमे प्रथम 30 विद्यार्थ्यास संस्थेमार्फत 501 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

 
Top