धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील सांजा रोड भागातील शिवाजीनगर परिसरातून जाणारा मुख्य शहरांतर्गत असलेला रस्ता गेल्या अनेक वर्षापासून केवळ लोकप्रतिनिधींची म्हणजेच खासदार आमदार नगराध्यक्ष व नगरसेवकांसह प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळेच प्रलंबित राहिला आहे. विशेष म्हणजे या रस्त्याने शहरातील अनेक विस्तारित भागांना जोडले गेले आहे. मात्र हा रस्ता नसल्यामुळे या भागातील नागरिकांना प्रचंड समस्येला तोंड द्यावे लागत आहे. 

धाराशिव शहरातील विस्तारित असलेल्या सांजा रोड परिसरातील संत गोरोबा काका नगर, सिद्धार्थ नगर, उस्मानपुरा, शिवनेरी नगर, तुळजाई चौक,देवा चौक, लक्ष्मी नगर,विठ्ठल नगर, साई श्रध्दा नगर, शिवाजीनगर, टापरे बिल्डिंग, आदींसह इतर भागांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. मात्र या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले आहे. रस्ता काम करण्यास कोणीही पुढाकार घेत नसल्यामुळे या परिसरातील रस्त्यालगत असणाऱ्या प्लॉट धारकांनी अतिक्रमण केले आहे. या रस्त्यामुळे या भागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे तर या खराब असल्यामुळे अनेक नागरिकांना मणक्याचा आजार झालेला आहे, विशेषता पावसाळ्याच्या दिवसात तर गुडघ्या इतके पाय व वाहने तर सातत्याने चिखलात फसत असल्यामुळे वाहनांचे नुकसान तर होतच आहे. विशेष म्हणजे बालवाडी, अंगणवाडीतील चिमुकली बालके तसेच शालेय विद्यार्थ्यांना चिखलातूनच आपला शाळेचा प्रवास नाईलाजाने करावा लागत आहे. या भागातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे व लोकप्रतिनिधी कडे वारंवार तोंडी व लेखी मागणी केलेली आहे. मात्र त्यांना आश्वासनापलीकडे दुसरे काहीही मिळालेले नाही. त्यामुळे या भागातील हा रस्ता रहदारीसाठी नगर परिषद प्रशासन करून देणार आहे की नाही ? असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे. आगामी होऊ घातलेल्या नगर पालिका निवडणुकीपूर्वी तरी किमान या रस्त्याचे काम होईल अशी या भागातील नागरिकांना आशा लागून राहिलेली आहे. जर या रस्त्याचे काम निवडणुकीपूर्वी नाही केले तर या भागातील नागरिक लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत. कारण लोकप्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक या भागातील नागरिकांना प्रत्येक निवडणुकीला रस्त्याचे काम करणार अशी खोटी थाप मारून त्यांची मते आपल्या पारड्यात पाडून घेत आहेत. आज पर्यंत त्यांनी खोटी आश्वासने देऊन मते पारड्यात पाडून घेतले असली तरी आता या भागातील नागरिक आक्रमक झाले असून आम्ही आमचे.... मतदानरुपी कर्तव्य नक्की पार पाडू ....या भूमिकेत असून होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकणार असल्याचे नागरिक बोलत आहेत.


 
Top