धाराशिव (प्रतिनिधी) - परभणी येथे संविधान उद्देशिकेचे विडंबन करणाऱ्या नराधमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तर संविधान प्रेमी भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्यावर पोलासांनी केलेल्या अमानुष मारहाणीत त्यांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. या सर्व घटनेस कारणीभूत असणाऱ्या नराधमासह संबंधित पोलिसांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांकडे एका निवेदनाद्वारे दि.18 डिसेंबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान उद्देशिकेचे तोडफोड करणाऱ्या नराधमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून त्यास मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी. तसेच भीमसैनिक व संविधान प्रेमी निषेध मोर्चामध्ये सामील झालेल्या नागरिक व महिलांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठी हल्ला करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत संविधान प्रेमी सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस यंत्रणेमधील पोलिसांचा शोध घेऊन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा. तसेच सुर्यवंशी यांच्या कुटुंबास शासनातर्फे आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाला योग्य तो आदेश देण्यात यावा. तसे न केल्यास राष्ट्रीय चर्मकार महासंघ व धाराशिव जिल्ह्याच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन समाजात होत असलेल्या धार्मिक, जातीय व महामानवांच्या विडंबनावरून तणाव निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत करण्याचे कार्य जाणूनबुजून काही समाजकंटक व संलग्न संघटना गुप्तपणे करीत आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन शेरखाने, जिल्हाध्यक्ष ऍड. गणपती कांबळे, जिल्हा सचिव शांतिनाथ शेरखाने, वीरशैव जंगम मठ ट्रस्टचे अध्यक्ष शिवानंद कथले, संपत शेरखाने, शहाजी शेरखाने, तुकाराम वाघमारे, धोंडीराम वाघमारे, आश्रुबा मुंडे, राजेंद्रकुमार संत, भारत सगर, शुभम मराठे, साहेबराव शेरखाने, बाळासाहेब वाघमारे, फराद शेख यांच्या सह्या आहेत.