धाराशिव  (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ६ महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर पुढील कालावधी व विद्यावेतन वाढवून मिळावे यासाठी आपण येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रशिक्षणार्थ्यांची मागणी मांडावी, अशी मागणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी आमदार कैलास पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील दि.१२ डिसेंबर रोजी मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्यातील विविध कार्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थी कार्यरत असून त्यांना ६ महिन्यांच्या कालावधीसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार ६ हजार रुपये, ८ हजार रुपये व १० हजार रुपये या प्रमाणे विद्यावेतन देण्यात येते. या प्रशिक्षणाचा कालावधी हा ६ महिन्यांचा आहे. परंतू ६ महिन्यांचे प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना धाराशिव जिल्हयामध्ये पुढील काम करण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत.

त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील विविध कार्यालयातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत असलेले प्रशिक्षणार्थ्यांचा ६ महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर पुढील कालावधी व विद्यावेतन वाढवून मिळण्यासाठी आपण येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रशिक्षणार्थ्यांची मागणी मांडावी, अशी मागणी केली आहे. यावर मयूर जानराव, प्रगती गायकवाड, तय्यब शेख, प्रशांत कुंभार व सौरभ उंबरे यांच्या सह्या आहेत.

 
Top