धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील सांजा रोडवरील भवानी चौकात मेडिकल शेजारी असलेल्या हिताची कंपनीचे 5 लाखांची रक्कम असलेले एटीएम मशीन पळवून नेल्याची घटना मंगळवारी दि. 10 डिसेंबर रेजी भवानी चौकात घडली.
एटीएम जवळ असलेल्या मेडिकल व्यावसायिकास सकाळी 8 वाजता एटीएममध्ये संशयास्पद साहित्य विखुरलेले दिसल्याने एटीएम चोरीची घटना उघडकीस आली. मेडिकल व्यावसायिकाने एटीएम मालक तथा फिर्यादी संदीप सराफ यांना मोबाईलवरून एटीएम मशीन चोरल्याची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी संदीप सराफ यांनी पोलिसांना माहिती दिली. आनंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब माजरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्वान पथकासह घटनास्थळी पोहचले.
फिर्यादी संदीप सराफ यांनी धाराशिवमधील आनंदनगर पोलिस ठाण्यात एटीएम मशीन चोरीची तक्रार दिली आहे. धाराशिवमध्येही थेट रस्त्याकडेच्या एटीएम मशिनच पळून नेल्याने चोरट्यांच्या वाढत्या धाडसामुळे परिसरातील नागरिकांसह व्यावसायिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एटीएममधील सीसीटीव्ही फुटजेच्या कॅमेऱ्याचे रेकॉडींग बंद असल्याने चोरटे कॅमेऱ्यात कैद होवू शकले नाहीत. मात्र शेजारील मेडिकलजवळ असलेल्या कॅमेऱ्यात एका छोट्या मालवाहतूक वाहनातून एटीएम मशीन पळवल्याचे दिसत आहे. पोलिसांनी भवानी चौकासह रस्त्याशेजारील मेडिकलजवळील कॅमेरे तपासणी करण्यात आले आहेत.