भूम (प्रतिनिधी)- माजी मंत्री तथा आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्या पुतने तथा तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत व जि.प. माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने भूम- नगर रोडवर आंदोलन करण्यात आले. नंतर उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मागील दोन महिन्यापूर्वी धनंजय सावंत यांच्या घरावरती गोळीबार करून धमकावले आहे. त्या आरोपींचा आजपर्यंत तपास लावलेला नाही. अशा घटना सावंत कुटुंबांच्या बाबतीत वारंवार घडत आहेत. ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखाना येथे अज्ञात व्यक्तीकडून एका ट्रॅक्टर चालकाकडे बंद लिफाफा देऊन आमदार सावंत यांचे पुतणे तथा तेरणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत व माजी जि. प. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांना बीड जिल्ह्यातील सरपंच कै. संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच तुम्हालाही जीवे मारले जाईल, असे धमकीचे पत्र देण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ तालुका शिवसेनेच्या वतीने भूम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना निवेदन देऊन या घटनेचा तात्काळ तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करावी, धनंजय सावंत व केशव सावंत यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. या मागण्यांची दखल न घेतल्यास भूम तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, प्रवीण देशमुख, समाधान सातव, विशाल ढगे, युवराज तांबे, निलेश शेळवणे, प्रा.ज्ञानेश्वर गिते, निलेश चव्हाण, प्रभाकर शेंडगे, महादेव वारे, शिवाजी भडके, अमोल खराडे, सुदाम नागटिळक, धनंजय काकडे, अर्चना दराडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.