तुळजापूर (प्रतिनिधी) - धाराशिव जिल्हयातील काम चालु असलेल्या पवनचक्की कंपनीकडुन बळाचा वापर करुन शेतकऱ्यांची आर्थिक फसवणुक करीत असुन अशा पवनचक्यांचा परवाना रद्द करावा. अन्यथा अशा पवनचक्यांन विरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा स्वराज्य संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन दिला.
निवेदनात म्हटले आहे कि,धाराशिव जिल्हयामध्ये अनेक कंपन्यांचे पवनचक्की बसविण्याचे काम चालु आहे. सदर पवनचक्की कंपनीकडुन त्यांनी कामावर ठेवलेल्या भाडोत्री गुंडाकडुन शेतकऱ्यांना दमदाटी, मारहाण व मानसिक त्रास देवुन त्यांच्या जमीनी त्यांना विश्वासात न घेता त्यांची फसवणुक करुन व योग्य मोबदला न देता, कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेवुन जबरदस्तीने जमीनी बळकावुन शेतकऱ्यांची फसवणुक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या कंपन्याचा त्रास होत असताना सुध्दा गावातील प्रमुख लोकांकडुन दबाव तंत्राचा वापरुन शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करण्याचे काम या कंपन्या करत आहेत. साम, दाम, दंड, भेद याचा वापर करुन या कंपन्या शेतकऱ्यांच्या जमिनी अल्प मोबदला देवुन गिळंकृत करीत आहेत. त्यामधुन शेतकरी आणि कंपनीमध्ये अनेक ठिकाणी वाद विकोपाला गेलेला ऐकण्यात येत आहे.
या कंपन्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विजेचे पोल रोवत असताना त्याचा योग्य मोबदला न देता मध्य जबरदस्तीने पोल रोवुन सर्रास काम पुढे घेवुन जात आहेत. यामुळे शेतकरी व पवनचक्की कंपनी यातील मतभेदाचे भविष्यातील तंटे विचारात घेवुन धाराशिव जिल्हयातील सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी मिळण्यासाठी या जमीनी अधिगृहीत करीत असताना त्याचा योग्य मोबदला निश्चित करुन त्या अधारे देण्यात यावी. अन्यथा पवनचक्की कंपनीवर कारवाई करुन त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा. असे निवेदन जिल्हाध्यक्ष महेश जीवनराजे इंगळे, कुमार टोले सह पदाधिकाऱ्यांनी दिले.