धाराशिव (प्रतिनिधी)- प्रबोधन युवा शक्ती महाराष्ट्र आयोजित , प्रबोधन परिषद 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील नामवंताचा पुणे येथील सर परशुरामभाऊ कॉलेजमध्ये भारतीय कामगार सेनेचे नेते डॉ.रघुनाथ कुचिक , ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे व ब्रह्मकुमारी मीरा दिदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल अक्षरवेल साहित्य महिला मंडळाच्या विद्यमान अध्यक्ष डॉ. सुलभा देशमुख यांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 18 वर्षापासून अक्षरवेल महिला साहित्य मंडळाने लिहित्या महिलांना एकत्रित करत त्यांच्या लिखाणाला प्रेरणा देऊन अनेकींना लिहिण्यास प्रवृत्त करून  त्यांची पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. तसेच अक्षरवेल महिला मंडळाचे सातत्यपूर्ण साहित्यिक कार्यक्रम ,विविध संमेलना मध्ये असलेले योगदान, दरवर्षी प्रकाशित होणारा “अंकुर“ दिवाळी अंक,  अक्षरवेल दिनदर्शिका अशा विविध उपक्रमांमधून महिलांना लिहिण्यासाठी सतत प्रेरणा दिलेली आहे.

धाराशिव येथे भरलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अक्षरवेल साहित्य मंडळाच्या महिलांनी भरीव योगदान दिले असून 18 जणींनी याच साहित्य संमेलनामध्ये स्वतःची पुस्तके प्रकाशित केली होती.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर अक्षरवेल महिला मंडळाच्या अध्यक्ष डॉ. सुलभा देशमुख म्हणाल्या की अक्षरवेल महिला मंडळाच्या सर्वच महिलांनी अगदी अंतप्रेरणेने लिखाणामध्ये दिलेले योगदान हे प्रसिद्धीसाठी मुळीच नसून आंतरिक ऊर्जेतून लिहिणाऱ्या या सर्व महिला आहेत. कविता ,गझल  सारख्या क्षेत्रांमध्ये तर आमच्या महिलांचे योगदान आहेच परंतु कथाकथन सारख्या  क्षेत्रांमध्ये सुद्धा त्यांनी भरीव योगदान दिले असून फक्त जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आमच्या साहित्यिक महिलांचा नावलौकिक पसरलेला आहे. याचा नक्कीच आम्हाला धाराशिवकर म्हणून अभिमान वाटतो. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल अक्षरवेल मंडळाच्या मार्गदर्शक कमलताई नलावडे ,संस्थापक अध्यक्ष डॉ. रेखाताई ढगे , उपाध्यक्ष स्नेहलता ताई झरकर ,प्रा विद्या देशमुख ,सचिव अपर्णा चौधरी आदींनी डॉ. सुलभा देशमुख यांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून अक्षरवेल साहित्य मंडळाचे कौतुक होत आहे.


 
Top