धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याचे विकासासाठी खेळाडूंचेही योगदान महत्त्वपूर्ण असून स्वतःच्या मेहनतीवर राज्य राष्ट्रीय स्पर्धेत पदक कमवणाऱ्या खेळाडूंसाठी आधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे मत नितीन काळे यांनी व्यक्त केले.
धाराशिव जिल्हा ज्युदो संघटनेच्या वतीने आयोजित सब ज्युनिअर आणि सीनियर वयोगटातील मुला मुलींच्या जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी धाराशिव जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष नितीन काळे बोलत होते. यावेळी उद्योजक रवी नरहिरे, प्रणव नरहिरे, धाराशिव जिल्हा ज्युदो संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, सहसचिव तथा तांत्रिक समिती अध्यक्ष अशोक जंगमे, स्पर्धा विभाग प्रमुख प्रतापसिंह राठोड, तांत्रिक समिती सचिव कैलास लांडगे आदिसह खेळाडू, पालक, प्रशिक्षक व मार्गदर्शकांची प्रमुख उपस्थिती होती.
धाराशिव येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलातील ज्युदो प्रशिक्षण केंद्रात घेण्यात आलेल्या या स्पर्धेतून नाशिक येथे होणाऱ्या सीनियर वयोगटातील आणि पुणे येथे होणाऱ्या सब ज्युनिअर वयोगटातील राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी धाराशिव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान चालू वर्षात राज्य राष्ट्रीय ज्युदो कामगिरी करत पदक विजेत्या जिल्ह्यातील खेळाडूंचा गौरव यावेळी उपस्थित यांच्या हस्ते करण्यात आला.