धाराशिव (प्रतिनिधी)- मुलाचा खून केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या पित्यास कळंब येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी अजन्म कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी की, आरोपी नामे शहाजी रामा कांबळे त्यांची पत्नी पद्मीनीबाई शहाजी कांबळे, मुलगा सुनिल शहाजी कांबळे, सून रेश्मा सुनिल कांबळे हे एकत्र राहत होते. परंतु आरोपी शहाजी यास यातील मयत सुनिल शहाजी कांबळे व त्यांची आई पद्मीनीबाई शहाजी कांबळे यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याची शंका घेत असल्यामुळे तुला व तुझ्या आईला मारून टाकतो म्हणून नेहमी शहाजी कांबळे भांडण करायचा. दि. 4 ऑक्टोबर 2019 रोजी रात्री अंदाजे 19.30 वाजण्याच्या दरम्यान साहेबराव बंडू कांबळे यांच्या घरासमोर त्यांची पत्नी सुशिला व आरोपीची पत्नी पद्मीनीबाई व मयताची पत्नी रेश्मा ही हजर असताना मयत सुनिल शहाजी कांबळे हा वडिलांना तंटामुक्त अध्यक्षांकडे चला प्रकरण मिटवू असे म्हणत असताना त्यांच्यामध्ये भांडणे लागले. त्यावेळी आरोपी शहाजी हा मयत सुनिल यास तुला ठार करतो. म्हणून आरोपी शहाजी रामा कांबळे हातात चाकू घेवून धावत आला. व मयत सुनिल शहाजी कांबळे यांच्या पोट्यात चाकू मारून गंभीर जखमी केले. त्यामुळे मयत सुनिल शहाजी कांबळे यास उपचारासाठी घेवून रूग्णालयात जात असताना सुनिल मयत झाला. त्यानंतर रेश्मा सुनिल कांबळे यांनी शिराढोण पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 142/19 कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. प्रकरणाचा तपास अधिकारी एपीआय शिवाजी दत्तात्रय गुरमे यांनी करून दोषारोपपत्र मा. कळंब अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केले. सुनावणीच्या दरम्यान सरकार पक्षाच्यावतीने एकूण 9 साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आल्यानंतर मुख्य फिर्यादी रेश्मा कांबळे ही फितूर झाली. तरीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल, न्याय वैज्ञानिक अहवाल व सरकारी अभियोक्ता ॲड. अशिष कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस भारतीय दंडविधान कलम 302 प्रमाणे आरोपीस अजन्म कारावास व पाच हजार रूपयांचा दंड कळंब येथील मा. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी दि. 9 डिसेंबर 2024 रोजी शिक्षा ठोठावली.