धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील कनगरा येथील ग्रामपंचायतचे सरपंच मधुकर भीमराव गंगणे यांनी शासनाची फसवणूक करून बोगस जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवून सरपंच झाले होते. मात्र जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर व जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाच्या आधारे गंगणे यांचे सरपंच पद रद्द केले आहे. हे आदेश दि.२९ नोव्हेंबर रोजी दिले आहेत. दरम्यान, बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षित जाग्यावर पाय पसरून बसलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की धाराशिव तालुक्यातील कनगरा येथील ग्रामपंचायत निवडणूक २०२२ साली डिसेंबरमध्ये पार पडली. हे सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले होते. मधुकर गंगणे हे हिंदू कलाल ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) या प्रवर्गात येत असताना देखील त्यांनी प्रशासनाची दिशाभूल करून हिंदू खाटीक या जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून ही निवडणूक लढवली होती. ते निवडणुकीमध्ये जिंकल्यामुळे सरपंच पदावर विराजमान झाले. या विरोधात विठ्ठल बागड सुरवसे यांनी जिल्हा जात पडताळणी समिती व जिल्हाधिकारी यांच्याकडे २०२३ मध्ये तक्रार केली होती. जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा जात पडताळणी समितीने दक्षता पथक व तोंडी युक्तिवाद करून सर्वंकष विकास विचार करून मधुकर गंगणे हे खाटीक अनुसूचित जातीचे नसून ते कलाल ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) या प्रवर्गात असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी गंगणे यांचे सरपंचपद रद्द करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे गंगणे यांचे बिंग फुटले असून आता त्यांना खुर्चीवरून पाय उतार व्हावे लागणार आहे.