आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास
धाराशिव-
धाराशिव जिल्ह्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प आणि योजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मोठी गती मिळालेली आहे. त्यांच्यामुळेच कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी तुळजाभवानी देवीच्या पावन नगरीत दाखल होण्याचा मार्ग प्रशस्त झाला. पुन्हा एकदा राज्याच्या नेतृत्त्वाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्यामुळे जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेले सर्व विषय आता आणखी वेगाने मार्गी लागतील असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर आमदार पाटील यांनी जिल्ह्याशी निगडीत असलेल्या अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजनांसाठी आपल्याला अधिक बळ मिळणार असल्याचे स्पष्ट केले. 
23 वर्षांपूर्वी डॉ.पद्मसिंह पाटील साहेबांनी आपले राजकीय वर्चस्व पणाला लावून कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून घेतली होती. महायुती सरकारने त्यासाठी 11 हजार 700 कोटी रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. आपल्या जिल्ह्यातील आठही तालुक्यातील सिंचन क्षेत्रात त्यामुळे भर पडणार आहे. डॉ.पद्मसिंह पाटील साहेबांनी सुरु केलेल्या या कामाच्या पूर्णत्त्वाची जबाबदारी आपली आहे. त्याला देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदामुळे मोठी ताकद मिळणार आहे. 
नळदुर्ग येथील राज्यातील पहिली भव्यदिव्य बसवसृष्टी, हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे स्मारक, तुळजापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक अशा अनेक कामांना आता गती मिळणार आहे. 
महाजनादेश यात्रेदरम्यान 2019 साली मुख्यमंत्री पदावर असताना देेवेंद्र फडणवीस यांनी कौडगाव एमआयडीसीत देशातील पहिला स्वतंत्र टेक्निकल टेक्स्टाईल पार्क जाहीर केला होता. महायुती सरकारच्या काळात एमआयडीसीमार्फत तो साकारण्याचा निर्णयही झाला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. तामलवाडी येथील औद्योगिक वसाहतीचा निर्णयही लवकरच अमलात येईल. देशात 75 नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यात धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा देखील समावेश होता. या महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या सहकार्याने निकाली निघाला आहे. या ठिकाणी एक अद्ययावत वैद्यकीय संकुल निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच शब्द दिलेला आहे. आता धाराशिवकरांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न देखील लवकरच पूर्णत्त्वास येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

चौकट..

*तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून रोजगार निर्मिती*

तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर तुळजापूर शहरातही धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीच्या दृष्टीने सुरु केलेल्या प्रयत्नांना आता बळ मिळाले आहे. रेल्वेमुळे अर्थकारणाला गती मिळणार आहे.पुढील 22 महिन्यात तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत 1328 कोटी रुपयांच्या तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास यापूर्वीच मंजुरी देण्यात आलेली आहे. अंतिम विकास आराखडा उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यात आला आहे. फडणवीस यांच्या नेतृत्त्वामुळे लवकरच त्याला मान्यता मिळेल असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
 
Top