उमरगा (प्रतिनिधी)-  तालुक्यात मागील पाच दिवसांपासून दररोज बदलणाऱ्या हवामानामुळे रब्बी पिकांवर मोठा परिणाम होत आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या शेंगा, हरभरा, मका, गहू या पिकांवर तसेच भाजीपाल्यावर विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिणामी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना विविध कीटकनाशकाची फवारणी करून अतिरिक्त खर्च सोसावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर चिंतेचे ढग दाटल्याचे चित्र आहे.

तालुक्यात यंदाच्या वर्षात सततचा पाऊस, अतिवृष्टी व परतीचा पावसाने खरीप हंगामाची पूर्णत: वाट लावली आहे. त्यावर मात करत शेतकऱ्यांनी रब्बीसाठी कंबर कसली. तालुक्यात रब्बीच्या सरासरी 42 हजार 879.27 हेक्टर क्षेत्रापैकी 38 हजार 949 हेक्टरवर 91 टक्के पेरणी झाली आहे. यंदाच्या रब्बी हंगामाच्या लागवडी पासूनच वातावरण पिकांसाठी पोषक राहिले नाही. कडाक्याची थंडी, अचानक येणारे ढग, हवेतील गारवा आणि धुके यामुळे पिकांवर मोठा परिणाम जाणवत आहे. परतीच्या चांगल्या पावसामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात रब्बी क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील नुकसानीचा आर्थिक तोटा रब्बी हंगाम भरून काढेल, अशी आशा होती. मात्र गेल्या आठवड्यापासून कायम ढगाळ वातावरणामुळे फुलोरा व फळ धारणेच्या स्थितीतील तूर पिकांवर अळ्यांचे प्रमाण वाढले आहे. तर रब्बी हरभरा, ज्वारी, गहू पिकांसह भाजीपाला यांवरही विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तुरीच्या शेंगा काळ्या पडत असून शेंगा कुरतडल्या जात आहेत. गव्हावर काही ठिकाणी खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ज्वारी व मका पिकावरही विविध रोगांचा प्रभाव झाला आहे. हरभरा पिकांवर बुरशी असल्यामुळे उभी पिके वाळून जात आहे. बाजारातून महागडी कीटकनाशके आणून पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपडत करत असला तरी त्याच्यावर पुन्हा पुन्हा आस्मानी संकट घोंगावत आहे.


तालुक्यातील हेक्टर मध्ये रब्बीचे सरासरी व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र व टक्केवारी

पिक            सरासरी             पेरणी          टक्के

रब्बी ज्वारी     16,700            8,380       50.18

गहू            2,475.23          3,042      122.90   

मका           222.29              137       61.36

हरभरा         19,500            24,680     126.56

इतर कडधान्ये    109                20        18.34

करडई         2,890               2,583     89.38

सुर्यफूल          510                   20     03.92

जवस            310                   48     15.48

ईतर गळीत   104.75                   39     37.23

एकूण        42,879.27           38,949    91%

 
Top