कळंब (प्रतिनिधी)-  येथील बस स्थानकात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवाशातून पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.  या चोराविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशातून जोर धरत आहे.

याबाबत अधिकृत असे की कळंब बस स्थानकात दररोज दिवसाकाठी किमान दोन ते तीन चोऱ्या या होत राहतात. याकडे पोलीस प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.  बस स्थानकावर एखादा पोलीस कर्मचारी कधी तरी दिसतो. पोलीस प्रशासन मात्र चोराच्या मुसक्या कधीच आवळत  नसल्याने प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्यामुळे प्रवाशांची बस स्थानकावर तोबा गर्दी दिवसेंदिवस होत आहे. त्यातच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कमी असल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढत आहे. अशातच संधी साधू चोर चोरी करतात. अनेक महिलांचे दागिने, अनेक पुरुषांचे पाकीट हातो हात लांब पास केले जातात. याकडे मात्र पोलीस प्रशासन डोळेझाक पद्धतीने बघत आहे. एवढ्या चोऱ्या होऊन बस स्थानकातील एकाही चोरीचा तपास अद्याप पोलिसांना लागला नसल्याचे बोलले जात आहे.  अनेकांचे मोबाईल चोरी गेले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने मोबाईलचा शोध लागणे जरुरीचे आहे पण मोबाईलचा सुद्धा साधा तपास लागत नसल्याने प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कळंब बस स्थानकात  प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा उभी करावी अशी मागणी प्रवाशातून जोर धरत आहे.

 
Top