धाराशिव (प्रतिनिधी)- मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. ही घटना मानव जातीला काळीमा फासण्या सारखी आहे. देशमुख यांचे हत्या प्रकरण विशेष न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण पसरलेले आहे. सर्वसामान्य नागरिक भयग्रस्त स्थितीमध्ये आपले जीवन जगत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था संपूर्ण बिघडलेली आहे. या घटनेमध्ये गावगुंडांनी ज्या निघृणपणे हत्या केलेली आहे. ते पाहता या घटनेतील सर्व दोषी गुन्हेगारांना व त्या घटनेपाठीमागील सर्व सूत्रधार यांच्या 24 तासात अटक करावी. संबंधित घटनेमधील सर्व मारेकरी व सर्व सूत्रधार यांना कठोरात कठोर शासन करण्यासाठी शासनाने विशेष कोर्ट स्थापन करावे जेणेकरून आगामी काळात अशा घटना घडणार नाहीत. तसेच या घटनेमध्ये संबंधित पोलीस प्रशासनामधील ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला आहे त्यांना तात्काळ निलंबित करावे. या घटनेतील गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन तसेच पीडित कुटुंबीयांना पोलीस संरक्षण आर्थिक मदत देण्यात यावी. या घटनेतील संबंधित गुन्हेगार तसेच सूत्रधार यांच्यावर लवकरात लवकर तीव्र कारवाई झाली नाही तर समितीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात येईल. अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आलेले आहे. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे अध्यक्ष श्रगौरव बागल, शहराध्यक्ष आकाश भोसले, दत्तात्रय साळुंके, योगेश आतकरे, ज्योतीराम काळे, अविनाश रणखांब, सतीश थोरात, दत्ता जावळे, प्रमोद पाटील यांचे सह समितीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.