धाराशिव (प्रतिनिधी)- केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच शेतकऱ्यांना देण्याच्या ‌‘मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने एक लाख पंप बसविण्याचा टप्पा ओलांडला आहे. अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्र यांनी दिली.

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांची पेड पेंडिंगची समस्या सोडविण्यासाठी ही योजना राबविण्यासाठी आग्रह आहे. शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वतंत्र करणारी आणि त्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करणारी ही योजना प्राधान्याने राबविण्याची सूचना त्यांनी केली आहे. सौर कृषी पंप बसविण्यामध्ये महाराष्ट्र राज्याने देशात आघाडी घेतली असून त्याबद्दल नुकताच केंद्र सरकारने आयोजित केलेल्या बैठकीत राज्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

राज्यात दि. 11 डिसेंबरपर्यंत एकूण 1,01,462 सौर कृषी पंप महावितरणकडून बसविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक 15,940 पंप जालना जिल्ह्यात बसविण्यात आले आहेत. बीड (14,705 पंप), परभणी (9,334), अहिल्यानगर (7630), छत्रपती संभाजीनगर (6267) आणि हिंगोली (6014) जिल्ह्यांमध्ये जालन्याच्या खालोखाल पंप बसविण्यात आले आहेत.

लातूर परिमंडळातील बीड जिल्हयात महाऊर्जाकडून महावितरणकडे वर्ग करण्यात आलेले व नवीन अर्ज असे एकूण 1 लाख 32 हजार 314 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 15 हजार 391 शेतकऱ्यांनी लाभार्थी शुल्क भरलेले असून 14 हजार 705 सौरकृषीपंप बसवण्यात आले आहेत. तसेच लातूर जिल्हयात महाऊर्जाकडून महावितरणकडे वर्ग करण्यात आलेले व नवीन अर्ज असे एकूण 17 हजार 965 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 3 हजार 403 शेतकऱ्यांनी लाभार्थी शुल्क भरलेले असून 1 हजार 910 सौरकृषीपंप बसवण्यात आले आहेत. तर धाराशिव  जिल्हयातील महाऊर्जाकडून महावितरणकडे वर्ग करण्यात आलेले व नवीन अर्ज असे एकूण  51 हजार 626 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 7 हजार 726 शेतकऱ्यांनी लाभार्थी शुल्क भरलेले असून 3 हजार 342 सौरकृषीपंप बसवण्यात आले आहेत. 

या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेत केंद्र सरकारकडून 30 टक्के तर राज्य सरकारकडून 60 टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषी पंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.

 
Top