धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव, पोहनेर, बेगडा, अपसिंगा, तुळजापूर जिल्हा मार्गाच्या रस्ता सुधारणा काम निकृष्ट, बोगस पद्धतीने करुन ठेकेदारास पाठीशी घालणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना निलंबित करुन त्यांच्या कालावधीत झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धाराशिव तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख यांनी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले की, धाराशिव - पोहनेर-बेगडा आपसिंगा-तुळजापूर रस्ता प्रजिमा - 33 किमी 0/00 ते 7/00 मध्ये 2 कोटी 32 लाख रुपयांचे सुधारणा करण्याचे काम करण्यात आले. संबंधित ठेकेदाराने सदर रस्त्याचे काम पाहणारे (तत्कालीन) शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या संगणमताने सदर काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले. दरम्यानच्या काळात पूर्वी काम पाहणारे शाखा अभियंता यांची बदली झाली. त्यामुळे सदर रस्त्याचे मोजमाप, तपासणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता यांच्या पत्रानुसार सहायक अभियंता के. एस. गायकवाड उपअभियंता मोरे यांच्यासोबत कामाची तपासण, मोजमाप करण्यासाठी गेले. रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने सदर काम कोणत्याच नियमाप्रमाणे मोजमापाप्रमाणे नव्हते. यामुळे गायकवाड यांनी नियमानुसार पाहणी व मोजमाप करण्यास चालू गेले असता, संबंधित ठेकेदाराने त्यांना चव्हाण व मोरे यांच्यासमोरच अंगावर जाऊन शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. हे सर्व घडत असताना दोन्ही वरिष्ठ अधिकारी फक्त पाहत होते. एवढे गंभीर प्रकरण घडूनही संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणार्या अभियंता गायकवाड यांच्यावर दबाव टाकून त्यांना रोखण्यात आले. घडलेल्या प्रकरणी गायकवाड यांनी 06 डिसेंबर रोजी उपअभियंता मोरे, कार्यकारी अभियंता चव्हाण यांना लेखी कळवूनही मोरे, चव्हाण यांनी कसलीही कार्यवाही केली नाही. तरी ठेकेदाराशी आर्थिक व्यवहार करुन आपल्याच एका अधिकार्याला मारहाण होऊन जीवे मारण्याची धमकी देणार्यास पाठीशी घालणारे व सदर रस्त्याचे निकृष्ठ व बोगस काम करुन घेणारे, उपअभियंता मोरे, कार्यकारी अभियंता चव्हाण यांना निलंबित करुन त्यांच्या कामाची उच्च स्तरीय चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा याविरोधात आंदोलन करण्यात येईल, असेही शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.