धाराशिव (प्रतिनिधी)- सर्व्हिस रोड व अंडरपासच्या मागणीसाठी वारंवार निवेदने देऊन, आंदोलन करुनही टाळाटाळ केल्यामुळे पोदार शाळेतील विद्यार्थ्याला अपघातात जीव गमवावा लागला. त्यामुळे संतप्त पालक व नागरिकांनी गुरुवारी (दि.12) डी-मार्टसमोर रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव शहरातील डी- मार्ट समोर व डी मार्ट ते आयुर्वेदिक कॉलेज या सर्व ठिकाणी नॅशनल हायवेच्या दोन्ही बाजूस सर्विस रोडचे काम सुरु आहे. सदर कामाच्या अनुषंगाने सर्विस रोड तयार करण्यापूर्वी सिमेंट-काँक्रीटच्या नाल्या बनविण्याचे कामकाज सुरु आहे. सदर काम करत असतान सर्विस रोडसाठी नियमानुसार जागा सोडने आवश्यक आहे. परंतु विविध ठिकाणी सर्विस रोडची रुंदी कमी झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे पोद्दार शाळेजवळ विकास नगर येथे व जुना उपळा रोड येथे नॅशनल हायवेच्या दोन्ही बाजूने लहान चार चाकी वाहने जातील असे असे दोन अंडरपास करणे गरजेचे असताना त्याकडे विविध तांत्रिक कारणे देऊन विलंब व टाळाटाळ केली जात आहे. सदर दोन्ही अंडरपास चे काम लवकर केल्यास शहरातील नॅशनल हायवेच्या दोन्ही बाजूने पोदार शाळेमध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना तसेच डी मार्टकडे व जुना उपळा रोडकडे सुरक्षीतपणे ये-जा करणे सोयीचे होईल व जीवितहानी होणार नाही. सदर क्षेत्रामध्ये डी मार्ट समोरील पुलावरून भरधाव वेगाने येणारे वाहन जोपर्यंत जुना उपळा रोड क्रॉस करून जाणार नाही तोपर्यंत अशाच प्रकारचे अपघात होत राहतील.
कारण तेथेच विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात नागरीक दोन्ही बाजूकडे ये-जा करत असतात. त्यानुसार सदर कामकाज नियमानुसार विहित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु त्यामध्ये जाणीवपूर्वक विलंब व टाळाटाळ केली जात आहे. या बाबत वरील संदर्भीय पत्रानुसार वेळोवेळी जिल्हा प्रशासनास व नॅशनल हायवे प्राधिकरणास निवेदने देऊन सुद्धा अद्याप पर्यंत डी मार्ट समोरील सर्विस रोडचे तसेच पोदार शाळेजवळील व जुना उपळा रोड येथील दोन्ही अंडरपासचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच डी-मार्ट समोर नॅशनल हायवेच्या विरुध्द बाजूस होत असलेल्या सर्विसरोडच्या जागेमध्ये जाणीव पुर्वक लोखंडी ब्रीज (पूल) चे कॉलम उभा करुन व त्याच्या अलीकडून सर्विस रोडच्या जागेमध्ये नालीचे काम सुरु केल्याने सर्विसरोडची रुंदी कमी झाली आहे. व अशाच प्रकारे शहरातील इतर ठिकाणी सुद्धा सर्व्हिस रोड ची रुंदी कमी झाल्याचे दिसून येते. याबत आपले कार्यालयास निवेदन देऊन सुद्धा सदरचे नियमबाह्य काम सुरूच आहे. यामुळे सदर क्षेत्रामध्ये अपघाताच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. त्यातच दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी पोदार शाळेतील एका विद्यार्थ्याचा शाळेतून घरी जाताना अपघाती मृत्यू झालेला आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची व चिंतेची आहे.
सदरचे क्षेत्र हे अपघात प्रवणक्षेत्र घोषित करण्यात आले आहे. सदर क्षेत्रामध्ये डी-मार्ट, पोदार सारखी नामांकीत शाळा तसेच इतर महत्वाचे ठिकाणे असून तेथे दोन्ही बाजूने मोठ्या संख्येने शहरातील नागरिक/पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी येत असतात. तसेच डी-मार्ट ला सुध्दा साहित्य खरेदी करण्यासाठी शहरातील लोक मोठ्या संख्येने दररोज ये-जा करत असतात. त्या अनुषंगाने नॅशनल हायवे प्राधिकरणाने सर्विस रोडचे काम सुरू असताना अपघात होऊ नयेत म्हणून विविध आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे होते परंतु त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच तेथे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी व जायबंदी झालेले आहेत. यास सर्वस्वी जिल्हा प्रशासन व नॅशनल हायवे प्राधिकरण जबाबदार आहे.
तरी वरीलप्रमाणे शहरातील डी मार्ट समोर व शहरातील इतर सर्व ठिकाणी होत असलेल्या सर्विस रोडची रुंदी कमी झाल्यास व आवश्यक उपाययोजना न केल्यास अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊन आणखी जिवीतहानी होऊ शकते. याबाबत वारंवार संबंधित काम करणाऱ्या नॅशनल हायवे प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचारी यांना लेखी, तोंडी कळवून सुध्दा त्यांनी चुकीच्या पध्दतीने हे नियमबाह्य काम सुरु ठेवले आहे. व त्यास जिल्हा प्रशासन डोळेझाक करीत आहे. त्यामुळे सदर क्षेत्रामधील आजू-बाजूचे सर्व नागरीक त्रस्त झाले आहेत व चिंतेत आहेत. त्यातच एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने सर्व नागरिक विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणात आक्रोश करीत आहेत.
तरी जिल्हाधिकारी महोदयांनी लक्ष देवून नियमानुसार शहरातील होणाऱ्या संपूर्ण सर्विस रोडची रुंदी कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच डी मार्ट समोर होणारा सर्विस रोड तात्काळ पूर्ण करून पोदार शाळेजवळ विकास नगर येथे व जुना उपळा रोड येथे लहान चार चाकी वाहने जातील असे प्रत्येकी एक असे एकूण दोन अंडरपास द्यावेत. अन्यथा सदरच्या नियमबाह्य कामामुळे तेथे होणाऱ्या अपघातांना व जिवीतहानीस संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणा जबाबदार राहतील याची गांर्भीयाने नोंद घ्यावी. तसेच दिनांक 10 डिसेंबर रोजी डी मार्ट समोर झालेल्या अपघातामध्ये पोदार शाळेतील एका विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्व संबंधित यंत्रणेवर/व्यक्तींवर तात्काळ कारवाई होऊन न्याय मिळावा म्हणून आम्ही शहरातील सर्व नागरिक/पालक दिनांक 12 डिसेंबर रोजी डी मार्टसमोर दुपारी 4 वाजता रास्ता रोको आंदोलन करणार आहोत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर खलील सय्यद, प्रविण कोकाटे, मामा बागल,सुरेश गवळी, गणेश वाघमारे, अब्दुल लतीफ, प्रेमानंद सपकाळ, श्रीकांत भुतेकर, विश्वेश्वर चपने, नंदकिशोर पाटील, प्रदीप घुटे-पाटील, रमेश ढवळे, ॲड. जावेद काझी, साबेर सय्यद, सोमनाथ गुरव, शहाजी भोसले, श्याम जहागीरदार, सिद्धेश्वर कोळी, रवी वाघमारे नंदकुमार माने, श्रावण जांगीड, सुरज भुतेकर, गणेश साळुंके, बंडू आदरकर, कलीम कुरेशी, अमित महंकाळे, अविनाश अंधारे, ॲड.राकेश कचरे, अनुप लोखंडे, पृथ्वीराज मोरे, अमित जगधने, प्रसाद देशमुख, बाबा मुजावर, कादर खान, आयाज शेख, एजाज काझी, इस्माईल शेख, वाजीद पठाण, गणेश राजेनिंबाळकर, प्रशांत पाटील, औदुंबर पांचाळ, बिलाल तांबोळी, विजय मक्रुवार, प्रवीण पवार, मिलिंद पेठे, बालाजी साळुंके, कुणाल निंबाळकर, गजानन खर्चे-पाटील, राघवेंद्र देशपांडे, गोविंद कसपटे, दत्तात्रय पवार, प्रशांतबापू साळुंके, शिवाजी पौळ, पांडुरंग रोहिदास, सुनील वाघ, पंकज पाटील व इतर पालक, नागरिकांची स्वाक्षरी आहे.