धाराशिव (प्रतिनिधी)- शहरालगतच्या सोलापूर- छत्रपती संभाजीनगर बाह्यवळण रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे सायकलवरून जाणाऱ्या सहावीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सायकलचे दोन तुकडे झाले असून, ट्रकही पलिकडच्या बाजूला उलटला. हा अपघात मंगळवारी दि. 10 डिसेंबर रोजी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास घडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन भूमीपूजन झाल्यानंर 11 महिने उलटूनही येथील सर्व्हीस रोडचे काम झाले नाही. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. विशेष म्हणजे अर्णव सोबत असलेले तिघे सायकलवरील मित्र दूर असल्यामुळे थोडक्यात बचावले.

बाह्यवळण रस्त्यावर असलेल्या पोदार इंग्लिश स्कूलचे वर्ग सुटल्यानंतर सहावीत शिकणारा अर्णव अजय सोनवणे (12, रा. पोलिस लाईन, धाराशिव) सायकलवरून मित्रासोबत जात होता. येथे सर्व्हीस रोड नसल्यामुळे सायकलवरून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय महामार्गावरून जावे लागते. अर्णव जात असताना अटकलगुड (कर्नाटक) ते जळगावला जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने (केए 13, बी.1773) जोरदार धडक दिल्यामुळे अर्णव उडून रस्त्यावर पडला. यात त्याच्या डोक्याला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच ट्रकही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जावून उलटला. अपघातात अर्णवच्या सायकलचे दोन तुकडे झाले. यामध्ये चालक व क्लिनरही जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 


गुरूवारी रास्ता रोको

अर्णव सोनवणे या विद्यार्थ्याच्या मृत्यूला प्रशासन व आयआरबी कंपनी जबाबदार आहे. या पूर्वी या बायपास रोडला सर्व्हीस रोड, पथदिवे व अंडरपाससाठी अनेक आंदोलने केली. परंतु आयआरबी कंपनी व प्रशासन यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आजपर्यंत 25 लोकांचा मृत्यू येथे झाला आहे. यांच्या निषेधार्थ गुरूवारी दुपारी 4 वाजता डीमार्टच्या समोर सर्व पक्षीय रास्ता रोको करणार आहेत. 

सोमनाथ गुरव, गटनेता शिवसेना ठाकरे गट धाराशिव


 
Top