तेर (प्रतिनिधी)- मराठवाड्यात पर्यटनाच्या अनेक संधी आहेत परंतु त्यांचा पुरेसा विकास होत नाही. परंतु जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास मराठवाड्यातील पर्यटन उद्योग चांगलाच वाढेल असा विश्वास सोलापूरच्या योगेश्वरी टूर्स चे संचालक अरविंद जोशी यांनी तेर येथे व्यक्त केला.
सोलापूरची सहल तेर येथे आली असताना ते पत्रकारांशी बोलत होते. तेरमध्ये अनेक मंदिरे, संत गोरोबा काकांची समाधी मंदिर, कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालय, उत्खननाची ठिकाणे तसेच तेर जवळच असलेल्या जागजी येथे असलेले महालक्ष्मीचे मंदिर आणि प्रेक्षणीय बारव यांना सोलापूरच्या या पर्यटकांनी भेट देऊन प्रेक्षणीय स्थळांची पाहणी केली.
यावेळी त्यांना तगर अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे, चैताली लामतुरे, ह.भ.प. दीपक महाराज खरात, भाग्यश्री बिराजदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सोलापूर इन्टॅकच्या डॉ. संध्या रघोजी, जतन फाउंडेशनचे कनगेरी, उमेश देवदास, डॉ. सोमनाथ राऊत, लोकमंगल शिक्षण संस्थेच्या सचिवा डॉक्टर अनिता ढोबळे इत्यादी मान्यवरांचा या पर्यटकात समावेश होता.