तुळजापूर (प्रतिनिधी)- दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ येथील तीन शेतकऱ्यांची तुर लातुर आडत बाजारात नेताना काक्रंबा ता. तुळजापूर येथील हाँटेल मल्हार समोर मालाचे वाहन अडवुन गाडी पुढे नेवुन वाहकासह शेतकऱ्यांना राँड, कोयत्याने मारहाण करुन तुरीचे 32 कट्टे किंमत 2 लाख 32 हजार 800 रुपयाचा शेत माल चोरुन नेल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले. महिला वर्गानंतर आता शेतकरी वर्गाकडे चोरट्यांनी आपला मोर्चा वळवल्याचे दिसुन येते. सदरील घटना मंगळवार दि.10 डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजेचा सुमारास घडली आहे.
या बाबतीत अधिक माहीती अशी कि, वाहन चालक रहिमान उस्मान शेख याने आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे कि. सोमवार दि.9 डिसेंबर रोजी रात्री यत्नाळ येथील अजय कोंडीबा वाघमोडे, संतोष खंडु धर्मे, सचिन कल्लाप्पा कौलगी यांची तूर लातूर मार्केटला नेण्यासाठी माझी गाडी क्र.एमएच 13 डीक्यु 4054 मध्ये अजय वाघमोडे तुरीचे चौवीस कट्टे, संतोष खंडु धर्मे यांचे तुरीचे बावीस कट्टे, सचिन कल्लाप्पा कौलगी यांचेतुरीचे आठ कट्टे असे एकूण 54 कट्टे अंदाजे प्रत्येकी 60 ते 80 किलो वजनाचे कट्टे गाडीमध्ये भरुन वाहतुकीचे भाडे घेवुन लातुर मार्केट निघालो. मंगळवार दि.10 डिसेंबर रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हॉटेल मल्हार लातुर रोड काक्रंबा येथे अचानक पाच ते सहा अज्ञात इसम माझ्या गाडी क्र. एमएच 13 डीक्यु 4054 समोर आले. तेव्हा गाडीचा स्पीड कमी केला. त्यानंतर मी गाडी थांबवली. तेव्हा तेथे रोडच्या बाजुला त्यांच्या होन्डा व टी. व्ही.एस कंपनीची मोटारसायकली उभ्या केलेल्या होत्या. गाडीच्या डाव्या व उजव्या बाजुस दोन दोन इसम थांबलेले दिसले. नंतर एका इसमाने माझ्या जवळ येवुन माझे गाडीची चावी काढली व मला गाडीतून उतरवले. त्यांनी गाडीचा ताबा घेतला. माझे सोबत पुढे बसलेल्या दोघांना गाडी बाहेर उतरवुन पाठीमागे बसवले. पुढे मी व तीन इसम बसले होते. त्यांचेतील दोन ते तीन इसम त्यांचे मोटारसायकल घेवुन आमचे मागे आले. त्यानंतर त्यांनी रोड सोडून अंदाजे 150 मिटर गाडी नेहण्यात आली. त्यांनतर त्या अज्ञात इसमांनी आम्हा चौघांना गाडी खाली उतरवुन लोखंडी रॉडने व कोयत्याने मारहाण केली.
आम्हास तेथेच बसवुन दोघे जण गाडी घेवुन गेले. चौघांनी मिळुन आम्हास मारहाण केली. उर्वरीत इसमांनी गाडी नेहुन गाडीतील एकुण 54 तुरीच्या कट्टयापैकी 32 तुरीचे कट्टे जबरीने घेवुन गेले. त्यापैकी प्रति कटाची किंमत अंदाजे 7 हजार 275 रुपये एकुण 32 कट्यांची किमत अंदाजे 2 लाख 32 हजार 802 रुपये आहे. अंदाजे 3 वाजण्याच्या सुमारास गाडी आमच्या जवळ आणुन सोडली. त्यांनी आम्हाला पोलीस तक्रार कराल तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर ते सर्वजन त्यांचे मोटारसायकलवर बसुन निघुन गेले. या तक्रार वरुन तुळजापूर पोलिसांनी गुरंन 310(2)126(2)118(1)352 कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. याचा पुढील तपास इन्सपेक्टर सुरेश नरवडे करीत आहेत.